कौशल्य हाच भावी पिढीसाठी यशाचा राजमार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:14 AM2021-05-22T04:14:28+5:302021-05-22T04:14:28+5:30
नाशिक : भावी पिढीने नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा, कौशल्य हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन संदीप ...
नाशिक : भावी पिढीने नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा, कौशल्य हाच यशाचा राजमार्ग असल्याचे प्रतिपादन संदीप फाउंडेशनच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील यांनी केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते. स्व.अण्णासाहेब वैशंपायन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘शिक्षण, नोकरी आणि रोजगाराच्या नवीन संधी’ या विषयावर त्यांनी एकविसावे पुष्प गुंफले. जुन्या काळातील पंतोजींच्या शाळा, एकशिक्षकी शाळा, ब्रिटिश काळातील शिक्षण, त्यानंतर शिक्षण संस्थांची निर्मिती, विद्यापीठे, याचा सारासार आढावा घेताना डॉ. पाटील यांनी या काळात शिक्षणाला गती मिळाल्याचे स्पष्ट केले. खासगी विद्यापीठांमुळे धोरणात्मक बदल झाले, त्यांनी अभ्यासक्रम निश्चित करून विद्यार्थ्यांच्या कौशल्याला वाव दिला. उद्योगांशी समन्वय साधून प्रेझेन्टेशन, कम्युनिकेशन आणि मार्केटिंगवर भर दिला. त्यातून नव्या पिढीला एक भक्कम व्यासपीठ मिळाल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
आपणही मुलांना वयाच्या अठराव्या वर्षीच भरारी घ्यायला शिकवले पाहिजे, तसा माईंडसेट तयार केल्यास नवा भारत निर्माण होईल. कोरोनाच्या संकटाचा अंदाज कुणालाच नाही, जगण्यासाठी पैसा कमविणे हे मूलभूत कर्तव्य आहे. अंगी कौशल्य असल्यास प्रतिष्ठेचे जीवन जगू शकता. त्यासाठी नवचेतनेचा ध्यास घ्यावा लागेल. जगताना लोकांना रोजगार देण्याचे ठरवले तर भावी पिढी उत्तम राहील, असा आशावाद डॉ. पाटील यांनी व्यक्त केला. यावेळी पुष्कर वैशंपायन उपस्थित होते. प्रास्ताविक मालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी केले तर चिटणीस संगीता बाफना यांनी आभार मानले.
इन्फो
समाजमाध्यमांचे आक्रमण
वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्ससमोर समाजध्यमांनी आव्हान उभे केले असल्याने वस्तुनिष्ठ पत्रकारितेचे महत्त्व वाढले असल्याचे पत्रकार गौतम संचेती यांनी सांगितले. कोरोनाकाळात अनेक स्थित्यंतरे वर्तमानपत्रांमध्ये झाली आहेत. उद्योग व्यवसाय बंद असल्याने त्याचा परिणाम जाहिरातींवर अर्थात उत्पन्नावर झाला. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात समाजमाध्यमांचे आक्रमण झाल्याने परिणामी प्रसिद्धीचा चेहरा बदलला आहे. खपाचे आकडे फुगवले जात आहेत. शासकीय जाहिराती हा खळगा भरून काढू शकत नाही, वर्तमानपत्राचा मुख्य स्तंभ पत्रकार असून, त्याच्यावर होणारा आघात हेच मूळ आव्हान असल्याचे संचेती म्हणाले.
------------------------
आजचे व्याख्यान
वक्ते - महेश दाबक
विषय - नवीन शैक्षणिक धोरण
----------
फोटो
२१ प्रशांत पाटील