साल्हेर राखीव वनक्षेत्रातील चंदनाच्या आठ झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 03:01 PM2020-03-15T15:01:45+5:302020-03-15T15:02:42+5:30
सटाणा : बागलाणमध्ये साग तस्करांच्या टोळीने आता डोकेवर काढले असुन यंत्रणेच्या कृपाशीर्वादाने राजरोस साग तस्करी सुरु असतांना वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत असलेले पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाची आठ झाडे कापून नेल्याने खळबळ उडाली आहे .चोवीस तास पाहरेकरी असलेल्या केंद्राजवळून दहा ते बारा लाख रु पयांची चंदनाची झाडे चोरून नेल्याने वन विभागाचे अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत .
बागलाण तालुक्यातील वन संपदा आणि वनक्षेत्रात चालणारी शासकीय कामे ठेकदार,तस्कर व वन यंत्रणा या त्रिकुटासाठी सध्या कुरण असल्याचे वेळोवेळी निदर्शनास येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी प्रसिद्ध डाबखलच्या जंगलात मोठ्या प्रमाणात सागाची तस्करी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वन विभाग खडबडून जागा होऊन पाच तस्करांना बेड्या ठोकल्या होत्या. ही घटना ताजी असतांनाच वन विभागाच्या साल्हेर येथील निसर्ग परिचय केंद्रालगत गेल्या पंचवीस ते तीस वर्षांची चंदनाचे डेरेदार वृक्ष तस्करांनी कत्तल करून चोरून नेले. या वृक्षांची अंदाजे किंमत बाजारात दहा ते बारा लाख रु पये आहे. ही तक्सरी होऊन आज आठ ते दहा दिवस होऊनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने वन विभागाची यंत्रणा संशयाच्या भोव-यात सापडली आहे. वास्तविक घटना घडल्यानंतर तत्काळ पंचनामा करून चोरट्यांंविरु द्ध गुन्हा दाखल करणे आवश्यक होते .परंतु झाडे चोरी होऊन आठ ते दहा दिवस उलटून कोणतीही कारवाई न झाल्याने तस्कर आणि वन यंत्रणा यांची अभद्र युती याच्या पाठीमागे काम करत असल्याचे बोलले जात आहे. पूर्ण वाढ झालेल्या चंदनाच्या झाडाची किंमत सुमारे एक ते दीड कोटीच्या घरात आहे. गेल्या काही वर्षापासून आयुर्वेदाकडे सर्वांचा कल वाढत आहे. गुणकारी आणि साईड इफेक्ट नसल्यामुळे आयुर्वेदाला पसंती मिळत आहे. ही बाब विचारात घेऊन औषधे तयार करण्यासाठी अन्य वनौषधींबरोबरच चंदनालाही आयुर्वेदिक कंपन्यांकडून प्रचंड मागणी असल्याचे सेवानिवृत्त वनाधिकारी बी.एस.जाधव यांनी सांगितले.