औद्योगिक वसाहतीत झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 01:14 AM2018-12-13T01:14:15+5:302018-12-13T01:14:46+5:30
अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
नाशिक : अंबड एमआयडीसीतील सिमेन्स कंपनी गेट नंबर एक समोरील पार्किंगच्या जागेत सामाजिक उपक्रमातून लावलेली झाडे रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून कापण्यात आली असून, यासंबंधी येथील व्यावसायिकांनी अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात व्यावसायिकांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, अंबड एमआयडीसी परिसरातील सिमेन्स कंपनीच्या गेट क्रमांक एकच्या समोरील जागेत अनेक छोटे व्यावसायिक गाळे आहे. या गाळेधारकांना पार्किंगसाठी गेल्या चार वर्षांपूर्वी एमआयडीसीकडून जागा देण्यात आली होती. याठिकाणी येथील व्यावसायिकांनी रस्त्याला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेत सामाजिक उपक्रमांतून वृक्षांची लागवड केली होती; मात्र येथील भूखंड मिळविण्यासाठी अज्ञान इसमांकडून येथील सुमारे १५ ते २० फूट उंचीची झाडे रात्रीच्या सुमारास कापून टाकण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत संबंधित गाळेधारकांनी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कार्यकारी अभियंता एमआयडीसी सातपूर यांना भेटून याबाबत तक्रार केली असून, वृक्षतोड करणाऱ्या इसमांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सदर जागा ही मोकळी दाखवून ही मोकळी जागा मिळविण्याचा संशय व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात संबंधित व्यावसायिकांनी नाशिक महानगरपालिका उद्यान विभाग, निमा विभागीय कार्यालय, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ नाशिक, वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक, उपअभियंता एमआयडीसी नाशिक, मुख्यमंत्री कार्यालय, प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय, नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार नोंदिविली असून, कारवाईची मागणी केली आहे.