पाथरे खुर्द शाळेच्या आवारातील झाडांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:27 PM2019-11-14T17:27:32+5:302019-11-14T17:30:01+5:30
वावी : सिन्नर तालुक्यातील पाथरे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत अज्ञात व्यक्तीने दिवाळीच्या सुट्टीत शाळा बंद असल्याचा गैरफायदा घेत झाडांची कत्तल केल्याची घटना उघडकीस आली.
पाथरे खुर्दमधील नवीन जिल्हा परिषद शाळा इमारतीच्या आवारात सुशोभीकरण करून झाडांची लागवड करण्यात आली होती. आकर्षक व उंच झालेली झाडे इमारतीची शोभा वाढवत होती. मात्र दिवाळीच्या सुट्टीत अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या आवारात असलेली विविध झाडे तोडून नुकसान केले. बुधवारी (दि.१३) सुट्या संपून शाळा सुरू झाल्यानंतर हा खोडसाळ प्रकार मुख्याध्यापकांना लक्षात आला. त्यांनी शाळा समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक बाळासाहेब सोळुंके, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र घुमरे, पाथरे बुद्रुकचे माजी सरपंच मच्छिंद्र चिने, शाळा समितीचे अध्यक्ष नानासाहेब गुंजाळ, नाना पडवळ, राजू सिनारे ,पप्पू गुंजाळ, वारेगावचे सरपंच मीननाथ माळी, सोनाली कारले, प्रियांका मोकळ आदींसह ग्रामस्थांनी नुकसानीची पाहणी केली. अज्ञात व्यक्तीचा तत्काळ छडा लावावा, यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.वावी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.