सटाण्यात डेरेदार वृक्षांची कत्तल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:40 AM2019-05-25T00:40:00+5:302019-05-25T00:40:50+5:30
शहरातील ताहाराबाद नाक्यावर सुरू असलेल्या स्कायवॉक पुलाच्या कामाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची पालिका प्रशासनाकडून राजरोस कत्तल केली जात आहे.
सटाणा : शहरातील ताहाराबाद नाक्यावर सुरू असलेल्या स्कायवॉक पुलाच्या कामाच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची पालिका प्रशासनाकडून राजरोस कत्तल केली जात आहे. वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडूनही वनविभागाने डोळेझाक केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
शहरातील ताहाराबाद नाक्यावर पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक पुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिजामाता कन्या विद्यालयालगत मोठमोठे डेरेदार वृक्ष अडथळा ठरत असल्याचे संबंधित ठेकेदाराचे म्हणणे आहे; मात्र पालिका प्रशासनाने वृक्षतोडीचा वनविभागाला कोणताही प्रस्ताव न देता संबंधित ठेकेदाराला किती व कोणती वृक्ष तोडावीत याचा कोणताही उल्लेख न करता वृक्षतोडीला परवानगी दिली. संबंधित ठेकेदाराने बुधवारी (दि. २२) दुपारी सहा डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली.
वास्तविक पालिका प्रशासनाने अडथळा ठरणाºया झाडांना क्रमांक टाकून तसा प्रस्ताव वनविभागाला सादर करणे आवश्यक होते; मात्र तसे न करता अधिकाराचा गैरवापर करून एन दुष्काळी परिस्थितीत डेरेदार वृक्षांची तोड करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकाराबाबत वृक्षप्रेमी गणेश सोनवणे यांनी वनकर्मचारी स्वाती सावंत यांच्याकडे तक्र ार केली असता दोन दिवसात चौकशी करून कारवाई करू असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
वनविभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाडांची कत्तल होत असताना तक्रार करूनही कारवाई न केल्याने संबंधित यंत्रणा संशयाच्या घेºयात सापडली आहे.
आम्ही सहा झाडे तोडण्याची परवानगीच दिलेली नाही. पुलाच्या कामात अडथळा ठरणारी चार झाडे तोडण्याची परवानगी दिली आहे. परवानगी पेक्षा अधिक झाडे तोडली असतील तर चौकशी करून संबधितांवर कारवाई करण्यात येईल. चार झाडे तोडण्याच्या बदल्यात संबंधित ठेकेदाराला पालिकेच्या भूखंडावर वीस झाडे लावण्याची सक्ती केली आहे. - हेमलता हिले-डगळे, मुख्याधिकारी, सटाणा पालिका