चिरला गळा : नायलॉन मांजाने घेतला दुचाकीस्वार महिलेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 09:07 PM2020-12-28T21:07:25+5:302020-12-28T21:09:08+5:30
नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले.
नाशिक : नोकरदार महिला दुचाकीने सायंकाळच्या सुमारास घरी परतत असताना, अचानकपणे पतंगीचा तुटलेला नायलॉन मांजा गळ्यावर घासला गेल्याने दुचाकीस्वार महिलेचा गळा चिरला जाऊन जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक दुर्दैवी घटना सोमवारी (दि.२८) द्वारका परिसरात घडली. या घटनेमुळे पुन्हा एकदा पक्ष्यांसह मानवाच्या जिवाला घातक ठरणाऱ्या नायलॉन मांजाचा सर्रास विक्रीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. नायलॉन मांजावर असलेली बंदी केवळ कागदावरच का? असा सवाल संतप्त नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.
सातपूर येथील एका खासगी कंपनीतून दिवसभराचे काम आटोपून भारती मारुती जाधव (४६,रा. सिद्धिविनायक टाउनशिप, साईनगर, अमृतधाम) या त्यांच्या दुचाकीने (एम.एच.१५. ५९५४) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरी जात होत्या. द्वारका चौकातून त्यांनी उड्डाणपूलावरुन दुचाकी नेली असता काही अंतर पुढे जात नाही, तोच हवेत तुटून आलेल्या नायलॉन मांजाचा फास जाधव यांच्या गळ्याला बसला आणि त्या रस्त्यावर कोसळल्या. यावेळी रस्त्याने मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांच्या हा प्रकार लक्षात येताच तत्काळ त्यांनी जखमी अवस्थेतील जाधव यांना त्वरित जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविले. यावेळी डॉक्टरांनी रुग्णालयात आल्यानंतर तपासून जाधव यांना मयत घोषित केले.