पुन्हा ‘शत-प्रतिशत’चा नारा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:11 AM2021-07-18T04:11:46+5:302021-07-18T04:11:46+5:30

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत आता कुणाशीही युती केली जाणार नाही. सर्व जागा आपल्याला स्वबळावर लढवायच्या असून पक्षाशी एकनिष्ठ, बांधील ...

The slogan 'hundred percent' again! | पुन्हा ‘शत-प्रतिशत’चा नारा !

पुन्हा ‘शत-प्रतिशत’चा नारा !

Next

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत आता कुणाशीही युती केली जाणार नाही. सर्व जागा आपल्याला स्वबळावर लढवायच्या असून पक्षाशी एकनिष्ठ, बांधील असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनच त्या लढवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्त्याने सक्रिय राहून सर्व जागांवर लढण्याच्या तयारीने कामाला लागण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या शहर पक्ष संघटनांच्या बैठकांमध्ये केले.

भारतीय जनता पक्षाच्या एन. डी. पटेल रोडवरील कार्यालयात शनिवारी सकाळपासून पक्ष पदाधिकाऱ्यांच्या एकामागोमाग एक बैठका पार पडल्या. त्यात सकाळी सर्वप्रथम शहर चिटणीस, उपाध्यक्ष यांची बैठक पार पडली. त्यानंतर शहराचे सरचिटणीस, शहराध्यक्ष आणि आमदारांच्या उपस्थितीत बैठक झाली. तर, दुपारी भाजपच्या विविध मंडलांच्या अध्यक्षांसमवेत प्रदेशाध्यक्षांनी स्वतंत्र बैठक घेतली. तर, भोजनपश्चात प्रदेशस्तरीय आघाड्यांच्या प्रमुखांशीदेखील त्यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना पाटील यांनी भारतीय जनता पक्ष हा व्यक्तीसापेक्ष संघटन नसल्याचे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. जो पदाधिकारी अधिक पक्षकार्य करेल, पक्षकार्यासाठी नियमित वेळ देईल त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा पक्ष आहे. त्यामुळे पुढील महापालिका निवडणुकीतदेखील पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या, बांधील असणाऱ्या कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यालाच पक्षाची उमेदवार, नगरसेवक तसेच महापौर पदापर्यंतची सर्व पदे देणार आहे. येत्या महापालिका निवडणुकीत कुणाशीही युती केली जाणार नाही. त्यामुळे प्रत्येक जागा आपल्याच पदाधिकारी, कार्यकर्त्याला लढायची असल्याने त्या दृष्टीने आतापासूनच तयारीला लागण्याचेही पाटील यांनी नमूद केले. तसेच पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेत त्यांच्याकडील जबाबदाऱ्या, तसेच बूथनिहाय नियोजन याबाबतच्या चर्चेवरही भर देण्यात आला. यावेळी त्यांच्यासमवेत जिल्ह्याचे प्रभारी जयकुमार रावळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

इन्फो

स्वबळावर झेंडा फडकवणारच

आपल्या पक्षाचे संघटन हे अन्य कोणत्याही संघटनेच्या तुलनेत अत्यंत भक्कम आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्ष पोहाेचलेला असून, कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाची कामे, उद्दिष्टे, ध्येयधोरणे सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कष्ट घ्यावे. त्यातूनच नाशिक महापालिकेत पुन्हा एकदा स्वबळावर झेंडा फडकवणारच असल्याचा विश्वासदेखील पाटील यांनी व्यक्त केला.

इन्फो

प्रदेशाध्यक्ष पदानंतर प्रथमच सलग दोन दिवस

प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पाटील हे प्रथमच सलग दोन दिवस सलग पक्षीय बैठकांसाठी नाशिकला थांबले आहेत. पूर्ण वेळ केवळ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन तसेच अनेक पदाधिकाऱ्यांच्या गटाला स्वतंत्र वेळ देऊन त्यांनी पक्ष संघटनेत पुन्हा चैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. रविवारीदेखील ते ग्रामीणच्या कार्यकर्त्यांना भेटणार असल्याने एकुणात कार्यकर्त्यांना पुन्हा बळ देण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्षांनी केल्याचे दिसून आले.

इन्फो

राजीनामा दे म्हटले की द्यायचा

भारतीय जनता पक्ष हा शिस्तप्रिय पक्ष आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून त्याचे पालन करायचे, ही पक्षाची परंपरा आहे. पक्षाने कुणा पदाधिकाऱ्याला, नगरसेवकाला, मंत्र्याला राजीनामा द्यायला सांगितला की तो दिला पाहिजे ही शिस्त आपल्याकडे पाळली जाते. पक्षात कुणाचीही दादागिरी, घराणेशाही खपवून घेतली जात नसून, पक्षासाठी झटणाऱ्याला न्याय देण्याचाच पक्षाचा प्रयत्न असतो, असेही पाटील यांनी नमूद केले.

Web Title: The slogan 'hundred percent' again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.