कागदपत्रांअभावी मुदतवाढीनंतरही संथगतीने प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:38 AM2019-05-01T00:38:03+5:302019-05-01T00:38:57+5:30
शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.
नाशिक : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक व पूर्वप्राथमिक प्रवेशासाठी पहिली सोडत जाहीर झाल्यानंतर दिलेली अंतिम मुदत ६ एप्रिलपासून ४ मे पर्यंत वाढ मिळाल्यानंतरही प्रवेशप्रक्रिया संथगतीने सुरू आहे. यात अनेक पालकांनी सोडत जाहीर झाल्यानंतर विविध आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होऊ शकत नसल्याने सोडतीत संधी मिळूनही प्रवेश घेताना विलंब होत आहे.
आतापर्यंत पहिल्या यादीत प्रवेशाची संधी मिळलेल्या ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांपैकी केवळ २ हजार ३१४ प्रवेश झाले असून, अजूनही १ हजार २०३ विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊ शकलेले नाहीत.
आरटीई प्रक्रियेत पहिल्या फेरीसाठी दिलेली मुदत संपेपर्यंत ३ हजार ५१७ पैकी केवळ २ हजार २५० च्या आसपास प्रवेश झाले होते. त्यामुळे शिक्षण विभागाने प्रवेशासाठी ४ मे पर्यंत मुदतवाढ दिली. या वाढीव मुदतीत चार दिवस उलटल्यानंतरही केवळ ७० ते ८० प्रवेशांची भर पडली असून, अपूर्ण कागदपत्रांसह शनिवार, रविवारची सुटी आणि सोमवारी मतदान यामुळे मुदतवाढ मिळाली आहे. जिल्हाभरातील ४५७ शाळांसाठी प्राप्त साडेचौदा हजार अर्जांपैकी ३ हजार ५१७ विद्यार्थ्यांची यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २६ एप्रिलपर्यंत मुदत होती.
विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ
पडताळणी समिती आणि तक्रार निवारण समितीकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र, तरीही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने काही पालकांनी तक्रार निवारण समितीचीच शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. प्रवेश कमी झाल्याने आणि पालकांची मागणी लक्षात घेता शिक्षण विभागाने पहिल्या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी मुदतवाढ दिली होती. परंतु वाढीव मुदतीत प्रवेश प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे.