निवृत्तिनाथ समाधी मंदिराचा जीर्णोद्धार धीम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 12:47 AM2021-10-18T00:47:47+5:302021-10-18T00:48:30+5:30
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
वसंत तिवडे/ त्र्यंबकेश्वर : श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.
संत निवृत्तिनाथ समाधी मंदिराचे काम काळ्या पाषाणात करण्यात येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २६ डिसेंबर २०१७ रोजी या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला होता. कामाची मुदत २ वर्षांची होती. पण या कामास ४ वर्षे १० महिन्यांचा कालावधी उलटूनही अजूनही काम पूर्ण झालेले नाही. ठेकेदार श्रीहरी तिडके सध्या रा. पनवेल यांना काम देण्यात आले आहे. कोल्हापूर येथून काळा पाषाणाचे ट्रक भरभरून आले. अत्यंत सुबक व आकर्षक असे काळ्या पाषाणात काम सुरू झाले. पण कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराच्या कामाभोवती ठेकेदाराची माणसेच घोटाळत आहेत.
वारकरी सांप्रदायाचे अध्वर्यू संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधी मंदिर जीर्णोद्धाराचे काम सुमारे २२ कोटींचे असून संजीवन समाधीमंदिर सभामंडप, संपूर्ण कोटाचे काम, दर्शन बारी आदीचे अंदाजपत्रक तयार आहे, पण काळ्या पाषाणाचे संजीवन समाधी मंदिराचे कामच अद्याप ८ फुट बाकी आहे. निवृत्तिनाथ समाधी संस्थानवर सद्यस्थितीत प्रशासकीय मंडळ कार्यरत आहे.
समाधी मंदिराचे काळ्या पाषाणातील काम २ कोटी ५७ लाख रुपयांचे असून आतापर्यंत ठेकेदाराला २ कोटी ४ लक्ष रुपये अदा करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. काम सध्या धीम्या गतीने सुरू आहे.
इन्फो
विश्वस्त मंडळ कधी नेमणार?
संत निवृत्तिनाथ समाधी मंदिर संस्थानवर अजूनही विश्वस्त मंडळाची नियुक्ती होऊ शकली नाही. दोन वेळा अर्ज बोलावूनही निवडप्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. सध्या संस्थानवर प्रशासकीय मंडळ कार्यरत असून, लवकरात लवकर विश्वस्त मंडळाची नियुक्ती व्हावी व कामाला गती मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.