अतिउष्णतेमुळे चाळीतच सडतोय कांदा
By admin | Published: June 18, 2016 11:08 PM2016-06-18T23:08:41+5:302016-06-19T00:32:23+5:30
आगीतून उठून फुफाट्यात : शेतकऱ्यांना केवळ दोनशे रु पये भाव
येवला : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिवापाड मेहनत करून शेतकऱ्यांनी कांद्याचे भरघोस उत्पन्न घेतले. मात्र कांद्याची आवक जास्त झाल्याने भाव घसरले. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी अपेक्षित किमान दोन हजार रुपये प्रतिक्विंटल भावासाठी चाळीत साठवून ठेवलेला कांदा सडू लागल्यामुळे आता पदरचे पैसे खर्च करून कांद्याची विल्हेवाट लावण्यास भाग पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे.
अनेक ठिकाणी चाळीत असलेल्या कांद्याचे पाणी गळत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पुन्हा एकदा मनुष्यबळ घेऊन सडका कांदा चाळीतून बाहेर काढणे आणि त्याची विल्हेवाट लावणे यावर शेतकरी पैसा खर्च करू लागला आहे. कांदा फेकताना शेतकऱ्यांच्या नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यांत अश्रू गोळा होत आहेत. भरवशाचा, टिकावू, निर्यातक्षम, वजनदार अन् अधिक बाजारभाव देणारा अशी ओळख असलेला उन्हाळ कांदा खरीप व रब्बी हंगामापेक्षा उन्हाळ कांदा शेतकऱ्यांसाठी लाखमोलाचा ठरतोय. मात्र, यंदा याच उन्हाळ कांद्याने संपूर्ण गणितेच बिघडवून टाकली आहेत, ते शासनाच्या धोरणांमुळे. साठवलेल्या कांद्याला दोन हजाराचा भाव मिळेल, या आशेवर अजूनही जिल्ह्यात २५ ते ३० टक्के कांदा चाळीतच आहे. एकीकडे बाजारभाव वाढत नाही. लाल कांदाही बाजारात विक्र ीला येत आहे, तर चाळीतला कांदाही सडत असल्याने भविष्य काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
शेतकऱ्यांनी पाच महिन्यांपासून जिवापाड जपून चाळीत साठवलेल्या कांद्याला बाराशे रुपयांच्या पुढे बाजारभाव जाऊ लागले, तोच केंद्र शासनाने निर्यातबंदीचा दुर्दैवी निर्णय घेतला होता. लोकप्रतिनिधी व शेतकरी, व्यापाऱ्यांच्या रेट्यामुळे केंद्र शासनाने निर्यात खुली करण्याची घोषणा केली. जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, दिल्ली तसेच पंजाब आदि राज्यांत कांदा जात आहे. मात्र मागणीचे प्रमाण अतिशय कमी आहे. परदेशात अत्यल्प मागणी आहे. त्याचमुळे निर्यात खुली होऊनही कांद्याचे बाजारभाव वाढण्याऐवजी दिवसेंदिवस कमी-कमीच होत आहे ही चिंतेची बाब आहे. तसेच शेतकऱ्यांनी मेहनतीने घेतलेल्या कांद्याला उतरती कळा लागली आहे. (वार्ताहर)