सामनगावरोडला झोपड्या जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:28 AM2019-01-24T00:28:08+5:302019-01-24T00:30:22+5:30
सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या.
नाशिकरोड : सामनगावरोड रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राशेजारील पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर अनधिकृत ७० ते ८० कच्च्या- पक्क्या झोपड्यांपैकी काही रहिवाशांनी स्वत:हून झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारनंतर मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपडपट्ट्या जमीनदोस्त केल्या. सामनगावरोड येथील शासकीय तंत्रनिकेतन व रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये असलेल्या पाटबंधारे विभागाच्या बुजवलेल्या पाटावर गेल्या काही वर्षांपासून कच्च्या पक्क्या झोपड्यांचे अतिक्रमण झाले होते. तेथील ६३ झोपडपट्टीवासीयांना सामनगावरोड अश्विन कॉलनी जवळील जयप्रकाशनगर घरकुल योजनेत घरे देण्यात आली आहे. तरीदेखील रहिवासी त्याचठिकाणी अनधिकृत झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास होते. रेल्वे सुरक्षा बल प्रशिक्षण केंद्राच्या सुरक्षितेच्या दृष्टीनेदेखील त्यांनी अनेकवेळा मनपाकडे अतिक्रमण काढण्याबाबत पाठपुरावा केला होता. याबाबत मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने झोपडपट्टीवासीयांना अतिक्रमण काढून घेण्याबाबत पूर्वसूचनादेखील दिली होती.
अतिक्रमण उपायुक्त रोहिदास बहिरम, अधीक्षक महेंद्र पगारे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, सुनीता कुमावत, नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे ६० कर्मचारी, ६ गाड्या, दोन जेसीबी बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास झोपडपट्टीचे अतिक्रमण काढण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी झोपडपट्टीवासीयांना नुकसान टाळण्यासाठी अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले.
कुठलाही वादविवाद न घालता काही झोपडपट्टीवासीयांनी स्वत:हून आपले कच्चे-पक्के झोपडीचे अतिक्रमण काढून घेतले. दुपारी तीननंतर अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने उर्वरित झोपड्या जमीनदोस्त केल्या. त्या ठिकाणी असलेले एक धार्मिक स्थळदेखील विधिवत हलविण्यात आले.