मुंबईला कमी प्रमाणात भाजीपाला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:59 AM2019-08-06T00:59:49+5:302019-08-06T01:00:34+5:30
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे.
पंचवटी : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला रविवारी (दि.४) पूर आला आहे. नाशिकसह मुंबई आणि अन्य परजिल्ह्यांतदेखील पाऊस सुरू असल्याने वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहे. मुंबईत व मुंबई उपनगरातदेखील पावसाची धुवाधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून मुंबई भाजीपाल्याची वाहने पाठविली गेली नाही. त्यामुळे मुंबईत निर्यात केल्या जाणाऱ्या भाजीपाला मालाला ब्रेक लागला होता. मात्र सोमवारी (दि.५) मुंबईला निर्यात केला जाणारा भाजीपाला माल कमी प्रमाणात रवाना झाला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतून रविवारी तब्बल सात ते आठ वर्षांनंतर मुंबईत शेतमालाची वाहने रवाना झाली नाही असे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. बाजार समितीतून मुंबई आणि गुजरातला दैनंदिन जवळपास २५ चारचाकी वाहने भरून शेतमाल निर्यात केला जातो. पावसामुळे रस्ते जलमय झाल्याने नाशिक शहरातील तसेच मुंबईकडे जाणाºया काही महामार्गावरदेखील पाणी साचल्याने रस्ते सर्वच वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केले होते. त्यामुळे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने मुंबईच्या दिशेने रवाना झालीच नाही. मुंबई वगळता अन्य जिल्ह्यातदेखील शेतमाल रवाना झाला नाही. केवळ गुजरात राज्यात सुमारे ५ ते ६ वाहने पालेभाज्या माल पाठविला असल्याचे भाजीपाला व्यापाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी (दि.५) बाजार समितीत फळभाज्यांची पंधरा तर सायंकाळी पालेभाज्यांची पाच टक्के आवक आली होती. पावसामुळे बाजार समितीत दैनंदिन होणाºया लाखो रु पयांच्या आर्थिक उलाढालीवर चांगलाच परिणाम जाणवला असल्याचे नाशिक बाजार समिती सूत्रांनी सांगितले. फळभाज्यांचे बाजारभाव सर्वसाधारण होते, तर सायंकाळी पालेभाज्या मालाचे दर किरकोळ वाढले होते. कोथिंबिरीला शेकडा १२ हजार रु पयेपर्यंत बाजारभाव मिळाला होता. रविवारी झालेल्या पावसामुळे बाजार समिती फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटल्याने बाजार समितीत फारशी गर्दी दिसून आली नाही.