कंटेनरमधून कांदा वाहतुकीने छोटे वाहतूकदार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:11 AM2021-07-15T04:11:49+5:302021-07-15T04:11:49+5:30
नाशिक जिल्ह्यातील कांदा वाहतूकदार अनेक वर्षांपासून पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, निफाड, वणी, दिंडोरी, देवळा, कळवण, सटाणा, येवला, नामपूर, उमराणे, चांदवड ...
नाशिक जिल्ह्यातील कांदा वाहतूकदार अनेक वर्षांपासून पिंपळगाव, लासलगाव, सायखेडा, निफाड, वणी, दिंडोरी, देवळा, कळवण, सटाणा, येवला, नामपूर, उमराणे, चांदवड ठिकाणी कांदा वाहतूक करीत असून, कांदा वाशी, पनवेल येथे कंटेनरमध्ये भरून निर्यात करतात. दोन वर्षांपासून कोरोनाचे निमित्त करून थेट कंटेनरच्या माध्यमातून कांदा वाहतुकीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे लहान वाहनांमधून कांदा वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कांदा वाहतूक व्यवसायावर नाशिक जिल्ह्यातील कमीत कमी ७०० ते ८०० ट्रक मालक, चालक, क्लीनर, तसेच ट्रान्सपोर्ट व्यवसायातील लोक अवलंबून आहेत. अनेकांनी वाहतूक व्यवसाय करण्यासाठी कर्ज घेत वाहने खरेदी केली आहेत. त्याचे हप्ते भरण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या वाहतूकदारांची आर्थिक कोंडी झाली आहे. छोट्या वाहतूकदारांचा संपूर्ण व्यवसाय शेतीमालावर अवलंबून आहे. व्यापारीवर्गाने कंटेनर बंद करून आमच्या उपजीविकेचे साधन सुरू ठेवण्यास मदत करावी, तसेच व्यापारी वर्गाने सरकारी यंत्रणाची दिशाभूल करू नये, असे सेनेच्या अवजड वाहतूक सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
इन्फो बॉक्स==
कंटनेरमुळे उपासमारीची वेळ
पूर्वीपासून नाशिकचे ट्रक कांदा घेऊन वाशी येथे कंटेनरमधे लोड करून पुढे कंटेनर पोर्टवर जात होता. आता नाशिकला कंटेनर यायला लागल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. कुठल्याही प्रकारच्या शेतमालाच्या वाहतुकीला विरोध नाही. मात्र, उपजीविका चालावी हीच आमची मागणी आहे.
-विश्वास तांबे, जिल्हाध्यक्ष, शिवसेना अवजड वाहतूक सेना