छोटे पक्ष, संघटनांची करावी लागते मनधरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 06:24 PM2019-04-03T18:24:25+5:302019-04-03T18:25:18+5:30
या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : लोकसभा निवडणुकीसाठी दोन किंवा तीन प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होणार असली तरी, स्वत:ला पुरोगामी वा प्रतिगामी म्हणवून घेणाऱ्या अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व संघटनांनादेखील या निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्व प्राप्त झाले असून, निवडणूक तोंडावर असल्यामुळे असे पक्ष व संघटनांची समविचारी पक्षाला मनधरणी करावी लागत आहे. मेळावे, बैठकांना निमंत्रण देण्यापासून ते व्यासपीठावर मानाचे स्थान दिले नसल्याच्या निमित्ताने राजी-नाराजीला तोंड फुटत असल्याने मोठ्या पक्षांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेना, रिपाइं (ए), राष्टÑीय समाज पक्ष अशा समविचारी पक्षांशी युती केली असून, कॉँग्रेसने राष्टÑवादी, जोगेंद्र कवाडे यांची पीपल्स रिपाइं अशा जुन्याच पक्षांना सोबत ठेवले आहे. महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने जाहीरपणे मोदी व शहा यांच्या विरोधात भूमिका घेतली, परंतु मते कोणाला द्यायची याबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी, त्यातूनच एकप्रकारे सेना-भाजपा वगळून कॉँग्रेस आघाडीला मतदान करा, असा संदेश अप्रत्यक्ष देण्यात आला आहे. या मोठ्या पक्षांबरोबरच जिल्ह्यात अनेक लहान-सहान राजकीय पक्ष व त्यांना संलग्न संघटना आहेत. एरव्ही या पक्षांचे उपक्रम त्यांच्यापुरता मर्यादित असले तरी, निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्यांनी स्वत:च स्वत:चे महत्त्व तयार करून घेण्यास सुरुवात केली असून, प्रसिद्धीमाध्यमांकडे जाऊन किंवा संबंधित राजकीय पक्षांकडे जाऊन स्वत:हून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवित आहेत. त्यामागे निव्वळ ‘विश्वासात’ घेतले जावे एवढी अपेक्षा ठेवण्यात येत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात राजकीय पक्षांनी मेळावे, बैठका बोलविताना राजकीय पक्ष, संघटनेचे नावे निमंत्रण द्यावे, फलकावर नेत्याचे छायाचित्र, मान्यवरांच्या यादीत नावे, व्यासपीठावर मानाचे पान, उपस्थिताना मार्गदर्शन करण्याची संधी दिली जावी, अशी भरमसाठ अपेक्षा ठेवली जात आहे. प्रचारासाठी साहित्य, वाहन, त्यासाठी येणारा खर्च व कार्यकर्त्यांचे खाणपानाची व्यवस्था भागविण्यासाठी उमेदवार व त्यांच्या राजकीय पक्षांकडे गळ घालण्यास सुरुवात झाली आहे. मुळातच यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून, त्यासाठी प्रत्येक घटक, संघटनांच्या सहकार्याची गरज उमेदवारांना आहे, अशा वेळी त्यांना नाराज करणे परवडेनासे असले तरी, त्यांची राजी-नाराजी राखण्यातच दमछाक होऊ लागली आहे. अजून निवडणुकीला वेळ असली तरी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांचा भाव वधारण्याची शक्यता आहे.