छोट्या पक्षांनीही थोपटले दंड
By admin | Published: January 16, 2017 01:22 AM2017-01-16T01:22:48+5:302017-01-16T01:23:01+5:30
आघाड्यांचा प्रयत्न : रिपाइं मात्र महायुतीच्या प्रतीक्षेत
संदीप भालेराव नाशिक
महापालिका निवडणुकीसाठी युती, आघाडी, पक्षप्रवेश आणि बलाढ्य उमेदवारांची इमेज मेकिंग होत असताना छोट्या पक्षांनी आपल्या ‘वोटबॅँके’च्या आधारे निवडणुकीत आव्हान उभे करण्याची रणनिती आखली आहे. याचाच एक भाग म्हणून विशिष्ट समाजघटकांच्या आघाड्यादेखील उदयास आल्या आहेत. या आघाड्यांनी संघटन सत्र सुरू करून निवडणुकीत दंड थोपटले असून, यंदा मराठा आणि बहुजनांचे निघालेले मोर्चे या पार्श्वभूमीवर आघाड्या नशीब अजमाविणार आहे.
महापालिका निवडणुकीत आजवर छोट्या पक्षांची कामगिरीही महत्त्वपूर्ण राहिली आहे. माकपा, बसपा, रिपाइं यांसारख्या पक्षांनी पालिकेत प्रतिनिधित्व केलेले आहे. लोकजनशक्ती पार्टी आणि समाजवादी पार्टीनेदेखील एकदा का होईना पालिकेत प्रवेश मिळविला आहे, यंदा माकपाने यंदा १६ जागांवर निवडणूक लढविण्याचे जाहीर करून रणशिंग फुंकले आहे. गेल्या निवडणुकीत माकपाने ११ जागांवर निवडणूक लढविली आणि त्यांना तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा किमान सात ते दहा जागा जिंकण्याचा त्यांचा इरादा आहे. भारिप बहुजन महासंघाने सर्वच जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे म्हटले असले तरी शहरातील त्यांची ताकद मर्यादित असल्याने भारिपकडून इच्छुकही फारसे नसल्याचे वास्तव आहे.
नांदेड आणि औरंगाबाद पालिकेत दहापेक्षा अधिक जागा मिळविणाऱ्या ओवीसी यांच्या एमआयएम नाशिक पालिकेत शंभरपेक्षा अधिक जागा लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांची अंतर्गत व्यूहरचना सुरू असून, मोहल्यांमध्ये जाऊन त्यांनी उमेदवारांचा शोध चालविला आहे. नाशिक आणि मुंबई पालिकेककडे यंदा एमआयएमने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांची भूमिका पालिकेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नाशिक महापालिकेत किती जागा लढविल्या जाणार हे अद्याप निश्चित नसले तरी पक्षाच्या निरीक्षकांकडून चाचपणी करण्यात आली असल्याचे समजते.
बहुजन समाज पार्टीने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. विशेष म्हणजे बसपाकडून निवडणूक लढविण्याबाबत कुणीही फारशी तयारी दर्शविली नसून आघाडीकडे इच्छुक वळत असल्याचे एकूणच चित्र आहे.