स्मार्ट बोर्ड अन डिजिटल अभ्यासक्रम, मुलांसाठी ‘दप्तरमुक्त शाळा’चे आकर्षण

By Suyog.joshi | Published: October 13, 2023 10:39 AM2023-10-13T10:39:34+5:302023-10-13T10:39:47+5:30

महापालिका शिक्षण मंडळातर्फे स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमधील ६५६ क्लासरूम्स व ६९ संगणक कक्ष विकसित करण्यात येत आहेत.

Smart Board on Digital Curriculum, the attraction of 'notebook free school' for children | स्मार्ट बोर्ड अन डिजिटल अभ्यासक्रम, मुलांसाठी ‘दप्तरमुक्त शाळा’चे आकर्षण

स्मार्ट बोर्ड अन डिजिटल अभ्यासक्रम, मुलांसाठी ‘दप्तरमुक्त शाळा’चे आकर्षण

सुयोग जोशी

नाशिक :  महापालिका शिक्षण मंडळातर्फे स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८२ शाळांमधील ६५६ क्लासरूम्स व ६९ संगणक कक्ष विकसित करण्यात येत आहेत. त्याचबरोबर शिक्षकांसाठी स्मार्ट बोर्ड आणि डिजिटल अभ्यासक्रम, मुलांमधील कलात्मक गुणांना चालना देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी 'दप्तर मुक्त शाळा, बाल संसदसह वंचित मुलींच्या शिक्षणाला आधार देणारा नन्ही कली प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यात येत असून ते राज्यासाठी आदर्श ठरत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.

मनपा शाळांमध्ये राबविण्यात येणाऱ्या मुले, पालकांसाठीच्या विविध सुविधांची माहिती देतांना श्री पाटील म्हणाले की, एकूण ८२ शाळांमधून ६५६ वर्गखोल्यांमध्ये ७५" इंटरॅक्टिव्ह पॅनल बसविण्यात आलेले आहेत. यासोबतच सर्व ६५६ वर्गखोल्यांमध्ये ग्रीन बोर्ड आणि सॉफ्ट पिन बोर्ड, विद्यार्थी बेंच, शिक्षक टेबल, शिक्षक खुर्ची, डस्टबिन, एलईडी ट्यूब लाइट्स, छतावरील पंखे पुरविण्यात आलेले असून रंगकाम आणि किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत. ६९ शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करण्यात आलेल्या असून प्रत्येक संगणक कक्षात २० संगणक, १ सर्वर, १ प्रिंटर, आणि एलएएन कनेक्टिव्हिटी देण्यात पुरविण्यात आलेली आहे. प्रत्येक संगणक कक्षात एअर कंडिशनर बसविण्यात आलेले आहेत, यासोबतच नेटवर्क रॅक, अग्निशामक यंत्रे, ग्रीन बोर्ड, सॉफ्ट पिन बोर्ड, कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, शिक्षक टेबल, डस्टबिन, शू रॅक देण्यात आलेले असून रंगकाम आणि किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यात आलेली आहेत.

८०० शिक्षकाना ‘स्मार्ट’ प्रशिक्षण

स्मार्ट स्कूल प्रकल्पांतर्गत ८०० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यात मुख्यत्वे विज्ञान प्रयोग अध्यापनशास्त्र, वाचन कक्ष उभारणे, योगाभ्यास, हस्ताक्षर विश्लेषणाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या समस्या ओळखणे आणि त्यांचे समुपदेशन करणे, वर्ग व्यवस्थापन, प्रभावी अध्यापनासाठी शिक्षण तंत्रज्ञान, चांद्रयान मोहिमेमागचे विज्ञान याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

‘दप्तरमुक्त शाळे’ला उस्फूर्त प्रतिसाद

मुलांमधील कलात्मक गुणांना चालना देण्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी 'दप्तर मुक्त शाळा ' हा नावीन्यपूर्ण उपक्रम नाशिक महानगरपालिकेतील शिक्षण विभागातील शाळांमध्ये राबवण्यात येत आहे. शिकण्यासाठी ताण विरहित चांगले वातावरण हवे यासाठी "दप्तर मुक्त शनिवार" साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या पाठीवरचे ओझे एक दिवस का होईना कमी होणार आहे. या उपक्रमात कला, क्रीडा, संगीत, कार्यानुभव या विषयांना प्राधान्य देण्यात आले आहे.

४२ शाळांमध्ये नन्ही कली प्रकल्प

वंचित मुलींच्या शिक्षणाला आधार देणाऱ्या ‘नन्ही कली’ या उपक्रमांतर्गत अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना दहा वर्षांचे औपचारिक शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करण्यात येते. एकूण ४२ मनपा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. शैक्षणिक सहाय्य आणि डिजिटल टॅब्लेटद्वारे शिक्षण देत सरकारी शाळांमध्ये स्थापन केलेल्या आणि शाळेच्या आधी व नंतर दोन तास कार्यरत असलेल्या नन्ही कली शैक्षणिक सहाय्य केंद्रांमध्ये दररोज शैक्षणिक सहाय्य प्रदान केले जाते. या उपक्रमामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी आणि सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान शिकविले जाते.

सायंकाळी ७ ते ९ मोबाईल बंद

महापालिका शिक्षण मंडळाच्यावतीने मुलांच्या विकासासाठी वेगवेगळे प्रयोग राबविले जात आहेत. त्याला मुलांसह त्यांच्या पालकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शाळेतील पालक संघाची शाळेच्यावतीने बैठक घेऊन दररोज सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत मोबाइल व टीव्ही बंद ठेवून विद्यार्थ्याचा अभ्यास व त्याने शाळेत दिवसभरात काय केले याची माहिती घेतली जात आहे. या वेळेत पालकांनी मोबाइल व टीव्ही बंद ठेवून अभ्यास घ्यावा अशा केलेल्या आवाहन उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-बी.टी.पाटील, शिक्षणाधिकारी, महापालिका शिक्षण मंडळ

Web Title: Smart Board on Digital Curriculum, the attraction of 'notebook free school' for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.