‘स्मार्ट कॅन्टोन्मेंट’मध्ये देवळालीचा समावेश?
By admin | Published: December 2, 2015 10:36 PM2015-12-02T22:36:55+5:302015-12-02T22:37:20+5:30
‘स्मार्ट कॅन्टोन्मेंट’मध्ये देवळालीचा समावेश?
नाशिकरोड : देशातील छावणी परिषदेत ‘अ’ वर्गात मोडणाऱ्या देवळाली छावणी परिषदेचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश करण्यास केंद्र सरकार विचाराधीन असून, संरक्षणमंत्री यांनी गेल्या महिन्यात पाठविलेल्या पत्राला लवकरच मान्यता मिळेल, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
देशामध्ये स्मार्ट सिटीबरोबर स्मार्ट छावणी परिषदेची निवडप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नाशिक मनपा हद्दीशेजारील मोठ्या प्रमाणावर विकसित होणारी देवळाली छावणी परिषदेची हद्द आहे. लष्कराचे महत्त्वाचे प्रशिक्षण केंद्र व एअरफोर्स स्टेशन देवळालीच्या अखत्यारीत येते. नाशिक शहरालगतची पाच हजार एकर जागा ही नागरी वसाहतीची असून, त्यामध्ये चाळीस खेड्यांचा समावेश आहे. त्यामुळे देवळाली छावणी परिषदेचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश झाल्यास त्याचा सर्वाधिक फायदा आजूबाजूच्या खेड्यांना होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले. याबाबत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी खासदार गोडसे यांनी सविस्तर चर्चा केली.
संरक्षण विभागाचे डायरेक्टर जनरल यांनी दिलेल्या अभिप्रायानंतर स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये घनकचऱ्याच्या माध्यमातून वीजनिर्मिती, ड्रेनेजच्या पाण्याचा योग्य वापर, रेन हार्वेस्टिंग आणि पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरेशनबाबत अधिक चांगल्या सुविधा होऊ शकतात. अशा प्रकारचे मेगा प्रोजेक्ट कॅन्टोन्मेंटमध्ये राबविले जाणार असून, या प्रकल्पांचा विचार करून केंद्राने देवळालीचा स्मार्ट कॅन्टोन्मेंटमध्ये समावेश होणेसाठी विचाराधीन असून, त्यास लवकरच मान्यताही मिळणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)