स्मार्ट सिटी कंपनीने नाशिककरांची निराशा केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:02+5:302021-06-24T04:11:02+5:30
नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनीने मनमानी पद्धतीने काम करीत नाशिककरांची ...
नाशिक : स्मार्ट सिटीच्या माध्यमातून दाखविण्यात आलेले स्वप्न पूर्ण करण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटी कंपनीने मनमानी पद्धतीने काम करीत नाशिककरांची निराशा केली. परंतु महापालिकेसह, राज्य शासन अथवा अन्य कोणत्याही यंत्रणेने त्यावर कोणतीही भूमिका न घेता कानाडोळा केल्याची खंत नाशिकमधील विविध क्षेत्रातील ज्येष्ठांनी व्यक्त केली.
‘लोकमत’ नाशिक आवृत्तीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त शहरातील ज्येष्ठ आर्किटेक्चर, शिक्षण व ग्राहक चळवळ, तसेच कृषी अर्थशास्त्र व चळवळीतील ज्येष्ठ व्यक्तींशी संवाद साधण्यात आला. यावेळी आर्किटेक्ट अरुण काबरा यांनी स्मार्टच्या माध्यमातून झालेल्या कामांविषयी तीव्र नाराजी व्यक्त करताना स्मार्ट सिटी कंपनीने नाशिकचे वाटोळे केल्याचे मत व्यक्त केले. शहरातील सर्वात चांगला डांबरीकरणाचा रस्ता स्मार्ट रोडच्या नावाखाली खोदून काम करण्यासाठी नियोजित वेळेच्या तिप्पटहून अधिक वेळ घेऊनही केवळ काँक्रिटीकरणच केले. सायकलसाठी तयार केलेल्या ट्रॅकवर एक सायकलही चालू शकेल की नाही, अशी अवस्था आहे. गोदावरीतून गाळ काढण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवूनही महापालिका, राज्य शासन अथवा प्रशासनातील कोणत्याही यंत्रणेने कोणतीही ठोस भूमिका घेतली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते प्रा. दिलीप फडके यांनीही स्मार्ट रोडच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट रोड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पातळीपेक्षा चार फुटांनी उंच असल्याचे नमूद असून नाशिकला होणाऱ्या पावसाची तीव्रता लक्षात घेता पावसाने जिल्हाधिकारी कार्यालयाचा तळमजलाच पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित करतानाच यंत्रणेच्या निष्क्रियतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मु्ख्य बाजारपेठेतील रस्ता खोदून ठेवण्यात काय नियोजन आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तर हीच परिस्थिती कृषी क्षेत्रात असल्याचे मत कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक तथा शेतकरी चळवळीचे नेते डॉ. गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले. राजकारणी, बाजार समिती आणि व्यापारी असे सर्वच घटक शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे नमूद करतानाच आताच्या आंदोलनाने राजकीय रसदीवर होत असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे राहत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणातही शासन व प्रशासकीय यंत्रणेकडून गांभीर्यपूर्वक कार्यवाही होत नसल्याकडेही या ज्येष्ठांनी लक्ष वेधले.
व्यासंग, साधना संपुष्टात येत आहे
नाशिक शहराला कला,साहित्य शिक्षणाचा मोठा वारसा आहे. परंतु, या क्षेत्रात नव्या निर्मितीसाठी आवश्यक असलेला व्यासंग, साधना दिवसेंदिवस आता उरली नाही. नव्या पिढीच्या हातात गुगल सारखे तंत्रज्ञान आल्याने अभ्यासाची तयारीच राहिलेली नाही. भाषे विचारणारेही राहिले नाहीत. त्यामुळे सर्वच बाबतीतील उथळपणा वाढला असल्याचे मत यावेळी प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केले.
म्हणून शेतीत गुंतवणूक वाढेल
खासगी बाजारपेठा कोरोना संकटामुळे जगभरातील व्यवसाय ठप्प असताना भविष्यात शेती क्षेत्रच शास्वत असल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे पुढील काळात शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढणार असून मोठे भांडवलदार आता शेती क्षेत्र काबीज करण्याच्या प्रयत्नात असल्याचे भाकित डॉ.गिरीधर पाटील यांनी व्यक्त केले.
===Photopath===
220621\225922nsk_40_22062021_13.jpg
===Caption===
वर्धापन दिन संवाद