स्मार्ट सिटी कंपनीही करणार आता ऑक्सिजन निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:38+5:302021-05-03T04:09:38+5:30
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातही गंभीर रुग्णांची संख्या अधिक होत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि ...
शहरात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातही गंभीर रुग्णांची संख्या अधिक होत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय आणि महापालिकेची रुग्णालये अपुरी पडत असून, खासगी रुग्णालयांमध्ये त्यापेक्षा वेगळी स्थिती नाही. ऑक्सिजन आहे तर बेड नाही आणि बेड आहे तर ऑक्सिजन नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. परंतु त्यापलिकडे जाऊन अनेक रुग्णालयात ऑक्सिजन संपत आल्यानंतर रुग्णाला स्थलांतरीत करण्यास सांगितल्यानंतर तर रुग्णांचा जीव धोक्यात येतो. सध्या शासकीय आणि राजकीय स्तरावर ऑक्सिजन निर्मितीसाठी धावपळ सुरू आहे. नाशिक महापालिकेच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची तयारी सुरू असताना आता याच संस्थेशी संबंधीत नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपेंट कंपनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प राबविणार आहे.
महापालिकेच्या वतीने पाचशे जम्बो सिलिंडर भरता येतील इतक्या क्षमतेचा प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. आता इतक्याच क्षमतेचा प्रकल्प स्मार्ट सिटी कंपनीदेखील साकारणार आहे. ऑक्सिजनची गरज बघता एखादा बंद प्रकल्प ताब्यात घेऊन तो कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांनी सांगितले.
कोट...
महापालिका आयुक्तांशी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबत चर्चा झाली असून, त्यांनीही कंपनीमार्फत आणखी एक प्रकल्प साकारण्यास अनुकूलता दर्शवली आहे. आता प्रकल्पासाठी लागणारा बेस रेट आणि अन्य तांत्रिक बाजूंची जमवाजमव सुरू आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प साकारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
- प्रकाश थवील, सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी, नाशिक