स्मार्टसिटीचे आढेवेढे, उत्पन्नवाढीसाठी मनपाचे पाऊल पडते पुढे...!
By Suyog.joshi | Published: October 31, 2023 01:18 PM2023-10-31T13:18:18+5:302023-10-31T13:18:39+5:30
महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत. नुकत्याच साठ जागांवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यातून पालिकेला वर्षाकाठी पाच ते सहा कोटींचा महसूल मिळ्णार आहे.
नाशिक : शहरात स्मार्ट सिटीकडून सतरा ठिकाणी पार्किंग सुरू करण्यासाठी प्रयत्न होते. मात्र मध्येच स्मार्ट सिटीने हा विषय सोडून दिला. महापालिका प्रशासन आता ज्या सतरा जागा आहेत. त्याची माहिती घेऊन पार्किंग सुरू करण्यासाठी चाचपणी करणार आहेत. या जागांसह पालिकेच्या मोकळ्या जागा असून त्यांचाही विचार केला जाणार आहे.
महानगरपालिकेने उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत.. नुकत्याच साठ जागांवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यातून पालिकेला वर्षाकाठी पाच ते सहा कोटींचा महसूल मिळ्णार आहे. यानंतर आता महापालिकेकडून पे ॲण्ड पार्किंग सुरू करणार असून याकरिता शहरातील सतरा जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यासाठी निविदा प्रक्रिया राबवून त्या मक्तेदाराला चालवण्यास दिल्या जाणार असून यातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न असणार आहे. करसंकलन व बांधकाम परवानगीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून व केंद्राकडून जीएसटी परताव्याची रक्कम येते. मात्र यातील निम्मा खर्च अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. उर्वरित रकमेतून दैनंदिन कामे व विकासकामासाठी ही रक्कम खर्चित होते. दरम्यान, विविध विकासासाठी निधी हवा असेल तर उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्याच्या सक्त सूचना पंधराव्या वित्त आयोगाने दिल्या आहेत. यानंतर पालिकेने उत्पन्नाचे स्त्रोतवाढीचे पर्याय शोधण्याचे काम सुरू केले आहे. त्यातूनच शहरात साठ ठिकाणी मोबाइल टॉवरसाठी जागा शोधल्या आहेत. यानंतर पालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकत शहरात पालिकेच्या मोकळ्या जागा पडून आहेत. तेथे पे ॲण्ड पार्किंग सुरू करून त्यातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न आहेत.
वाहनांची संख्या वाढणार
शहरात पार्किंगची समस्या नवीन नाही. वाहने लावण्यासाठी जागा नसल्याने मुख्य रस्त्यांवर वाहने लावली जातात. शहरात चार वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. अशा वेळी वाहनांची संख्या वाढणार आहे. त्या दृष्टीने ही वाहनतळे महत्त्वाची ठरणार आहेत. प्रारंभी स्मार्ट सिटीने ही वाहनतळ उभारण्याची तयारी दर्शविली, मात्र पुढे हा विषय बारगळला. परंतु पालिकेने उत्पन्नवाढीसाठी पे ॲण्ड पार्किंगसाठी हालचाली सुरू केल्याने यातून वाहतूक कोंडीच्या समस्येतून वाहनधारकांची सुटका होण्याची शक्यता आहे.
महापालिकेकडून करवसुलीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. मोबाइल टॉवरमधून पालिकेला महसूल मिळणार आहे. उत्पन्नवाढीसाठी जे शक्य आहे ते पर्याय आहे. शहरात पालिका आपल्या जागेवर पे ॲण्ड पार्किंग सुरु करणार आहे. येत्या काही दिवसांत याबाबत कार्यवाहीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
-प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, मनपा