महापालिकेच्या भूमिकेला स्मार्ट सिटीचा छेद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 01:29 AM2019-12-31T01:29:45+5:302019-12-31T01:30:02+5:30

गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढणे आणि त्या अनुषंगाने विविध सतरा कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेने असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटी कंपनीने मात्र या भूमिकेला छेद देत कॉँक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेतला आहे.

 Smart City pierces municipal role! | महापालिकेच्या भूमिकेला स्मार्ट सिटीचा छेद!

महापालिकेच्या भूमिकेला स्मार्ट सिटीचा छेद!

Next

नाशिक : गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढणे आणि त्या अनुषंगाने विविध सतरा कुंडांचे पुनरुज्जीवन करण्याबाबत महापालिकेने असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटी कंपनीने मात्र या भूमिकेला छेद देत कॉँक्रिटीकरण काढण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी (दि.३०) याबाबत कंपनीच्या बैठकीत जोरदार चर्चा झाली असली तरी अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात यावर फैसला होणार आहे.
नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेडच्या संचालक मंडळाची चौदावी सर्वसाधारण बैठक सोमवारी (दि.३०) मनपाच्या मुख्यालयात झाली. मंत्रिमंडळ विस्तार असल्याने स्मार्ट सिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे हे उपस्थित राहु शकले नाही. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी या विषयावर वादळी चर्चा झाली. कंपनीच्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदापात्रातील म्हणजेच रामकुंड परिसरातील कॉँक्रिटीकरण काढण्यात येणार असून, त्याचा शुभारंभदेखील झाला होता. मात्र, त्यानंतर या कामाला आक्षेप घेतला गेल्यानंतर प्रकल्प सल्लागाराला पुन्हा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
तसेच भूजल सर्वेक्षण विभागाची मदत घेण्यास सांगण्यात आले. तथापि, यासंदर्भात गुरुमित बग्गा, शाहू खैरे आणि स्थायी समिती सभापती उध्दव निमसे यांनी प्रश्न उपस्थित केले. २०१७ मध्ये यासंदर्भात एका पर्यावरणप्रेमीने गोदाघाटातील कॉँक्रिटीकरण काढावे आणि १७ पुरातन कुंडांचे पुनरुज्जीवन करावे.
यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने यासंदर्भात महापालिकेकडे बाजू मांडण्यास सांगून याचिका निकाली काढली. त्यानंतर महापालिकेने याचिकाकर्त्याला सुनावणी देऊन कॉँक्रिटीकरण काढणे आणि गोदाकाठाचे पुनरुज्जीवन शक्य नसल्याचे स्पष्ट केले होते. तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी तर गोदापात्रातील कॉँक्रिटीकरण काढून कुंड आढळली नाही तर काय करायचे असे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिले होते. म्हणजेच महापालिकेने कॉँक्रिटीकरण हटविण्यास असमर्थता व्यक्त केली असताना स्मार्ट सिटीने या कामाचा घाट कसा घातला असा प्रश्न केला. त्यानंतर आयुक्त गमे यांनी यासंदर्भात प्रकल्प सल्लागार आणि भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.
या बैठकीमध्ये माजी महापौर रंजना भानसी यांच्या जागेवर नवनिर्वाचित महापौर सतीश कुलकर्णी यांची नियुक्ती, तसेच सरकारमधील दिल्लीचे रेणू सतीजा यांचे जागेवर रामशरण मीना यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, संचालक भास्कररावर मुंढे, तुषार पगार, सभागृह नेते सतीश सोनवणे आदी उपस्थित होते.
स्मार्ट रोडसाठी प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त
त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ दरम्यानचा मॉडेल स्मार्ट रोड २६ जानेवारीपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. मात्र, त्यांच्या रायडिंग क्वॉलिटीचा प्रश्न कायम आहे. आधी रस्ता पूर्ण करून घ्या मग त्याबाबत निर्णय घेऊ, असे यासंदर्भात आयुक्त गमे यांनी सांगितले.
‘त्या’ भागातील कॉँक्रिटीकरण काढणार
गोदाघाट परिसरातील रामकुंडाच्या पुढील बाजूस म्हणजे दुतोंड्या मारुती पतरसरातील तळ कॉँक्रिटीकरण काढण्यास संचालक सहमत झाल्याची माहिती आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. अर्थात हे कामदेखील तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Web Title:  Smart City pierces municipal role!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.