‘स्मार्ट सिटी’चा पुनर्प्रस्ताव ‘एसपीव्ही’विनाच?
By admin | Published: February 2, 2016 12:07 AM2016-02-02T00:07:05+5:302016-02-02T00:11:42+5:30
सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष : पुण्याच्या प्रस्तावाबाबत राजकीय पक्षांकडून चाचपणी
नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पहिल्या टप्प्यात नाशिकची बस चुकल्यानंतर आता प्रशासनाकडून जून अखेरपर्यंत पुन्हा एकदा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू झाली असली तरी पुनर्प्रस्ताव ‘एसपीव्ही’सह की ‘एसपीव्ही’विना याबाबत पुन्हा एकदा राजकीय स्तरावर घमासान पहायला मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने ‘एसपीव्ही’ला अटी-शर्तींवर मान्यता देत उपसूचनांसह ठराव केंद्राला सादर केला होता. त्यामुळे पुणे शहराचा समावेश एसपीव्हीविना झाला की एसपीव्हीसह याबाबतची चाचपणी राजकीय पक्षांकडून केली जात असून, सत्ताधारी पक्ष पुनर्प्रस्तावाबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागून राहणार आहे.
केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश केला, तर नाशिक ३४व्या क्रमांकावर फेकले गेले. आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा ३० जूनअखेर फेरप्रस्ताव सादर करण्याची संधी दिली असल्याने नाशिक महापालिकेनेही त्यादृष्टीने तयारी करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत.
स्मार्ट सिटीबाबत काही सुधारणा व दुरुस्त्यांसह नव्याने फेरप्रस्ताव सादर होताना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागणार आहे.