स्मार्ट सिटीच्या रस्ता कामांनाही ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 01:36 AM2019-12-17T01:36:43+5:302019-12-17T01:37:01+5:30

स्मार्ट सिटीच्या मॉडेलरोड आणि गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाच्या कामानंतर आता गावठाण विभागातील रस्तेदेखील वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यात आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या रस्ते फोडून सर्व्हिस रोड टाकण्यास विरोध झाल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या कामाला स्थगित करण्यास सांगितले आहे.

 Smart City's road work breaks too! | स्मार्ट सिटीच्या रस्ता कामांनाही ब्रेक!

स्मार्ट सिटीच्या रस्ता कामांनाही ब्रेक!

Next

नाशिक : स्मार्ट सिटीच्या मॉडेलरोड आणि गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाच्या कामानंतर आता गावठाण विभागातील रस्तेदेखील वादग्रस्त ठरले आहेत. अलीकडेच पार पडलेल्या कुंभमेळ्यात आणि त्यानंतरच्या कालावधीत झालेल्या रस्ते फोडून सर्व्हिस रोड टाकण्यास विरोध झाल्याने आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या कामाला स्थगित करण्यास सांगितले आहे. सर्व रस्त्यांची पडताळणी महापालिकेच्या शहर अभियंत्यांनी करावी आणि गरज नसेल तर एकही रस्ता न फोडता बाजूनेच या केबल टाकाव्यात, असे स्पष्ट निर्देश देण्यात आल्यानंतर पंचवटीतील कामे थांबविण्यात आली आहेत.
स्मार्ट सिटी अंतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंट म्हणजेच गावठाण विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी सुरुवातीला रस्ते, पाणी आणि गटारींची एकत्रित कामे करण्यात येणार होती. मात्र, त्यावेळी साठ टक्के जादा दराची निविदा आल्यानंतर हा विषय गाजला. त्यामुळे ज्यादा दराची निविदा रद्द करून प्रत्येक वेगवेगळ्या कामांच्या स्वतंत्र निविदा मागवण्यात आल्या होत्या.
गावठाण भागातील रस्ते विकसित करताना काही ठिकाणी फक्त सर्व्हिस लाईन्स टाकण्याची कामे करण्यात येणार आहेत. मात्र, त्यासाठी रस्ते खोदण्यात येणार आहेत. शहरात २०१४-१५ या कालावधीत कुंभमेळा झाला. त्यावेळी शहरात रिंगरोड आणि अन्य रस्ते विकसित करण्यात आले. त्याचवेळी पंचवटी परिसरात अनेक रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे मालेगाव स्टॅँड ते मखमलाबाद नाका रस्त्यावर खोदकामाची तयारी करण्यात आल्यानंतर त्याला कडाडून विरोध करण्यात आला.
सर्व्हिस लाईन्स टाकायच्या असतील तर त्यासाठी कटरचा वापर करून रस्त्याच्या बाजूने आवश्यक तेवढेच खोदकाम करावे आणि त्यात लाईन्स टाकाव्यात अशा प्रकारच्या सूचना करण्यात आल्या. यासंदर्भात सोमवारी (दि.१६) महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडेदेखील आक्षेप घेण्यात आल्यानंतर त्यांनी महापालिकेचे शहर अभियंता संजय घुगे आणि कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना बोलावून प्रत्येक रस्त्याची तपासणी करण्यास सांगितले आहे.
गावठाणातील रस्त्यांबाबत माहिती
रस्त्याची तपासणी केल्यानंतरच तो रस्ता फोडणे आवश्यक आहे किंवा नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले. दरम्यान, पंचवटीतील या रस्त्यांच्या कामाबाबत स्मार्ट सिटीचे संचालक गुरुमित बग्गा, शाहू खैरे आणि गजानन शेलार यांनी कंपनीच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना गावठाणातील रस्त्यांबाबत पूर्ण माहिती देण्यात आली असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांनी दिली.
गावठाणातील कामे करताना सर्वच रस्ते फोडण्यात येणार नाहीत. एक ते सात प्रकारची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यातील काही रस्त्यांवर केवळ सर्व्हिस लाईन्स टाकायच्या आहेत. रस्त्यांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार कामे करण्यात येणार आहेत.
- प्रकाश थविल, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी
गावठाणातील रस्त्यांच्या कामांचे सर्वेक्षण करून कोणते रस्ते फोडण्याची गरज आहे किंवा नाही याची पडताळणी शहर अभियंता आणि कंपनीचे अधिकारी करतील. त्यानंतरच रस्त्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. रस्त्यावरून सर्व्हिस लाईन्स टाकायच्या असतील तर त्यासाठी कटर किंवा अन्य आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रस्ते फोडणे थांबविण्यासाठी पडताळणी करण्यात येणार आहे.
- राधाकृष्ण गमे, आयुक्त, महापालिका

Web Title:  Smart City's road work breaks too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.