विज्ञानाचा ‘स्मार्ट’ आविष्कार
By admin | Published: December 30, 2015 10:33 PM2015-12-30T22:33:47+5:302015-12-30T22:59:14+5:30
विद्यार्थ्यांचे संशोधन : विभागीय प्रदर्शनात शंभर प्रकल्प सादर
नाशिक : सौर ऊर्जेवर चालणारा फवारणी रोबो, सोसायटीच्या टाकीमध्ये सायकलद्वारे पाण्याचा पुरवठा, स्मार्ट फिरता पूल, स्मार्ट व्हर्टिकल वाहनतळ, हायड्रोलिक वृक्ष पुनर्रोपण यंत्र, वायू शुद्धीकरण यंत्र, पायऱ्या चढताना ऊर्जेची निर्मिती, स्मार्ट सिटीमधील स्मार्ट पर्यावरणपूरक रस्ते अशा एका ना अनेक कल्पना शालेय विद्यार्थ्यांच्या संशोधनातून दिसून आल्या. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस प्रकल्पाच्या सादरीकरणातून वैज्ञानिकाच्या सुप्त कलागुणांचे दर्शन घडविले.
निमित्त होते, क. का. वाघ तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित दोन दिवसीय विभागीय विज्ञान प्रदर्शनाचे! स्मार्ट सिटी संकल्पना, ऊर्जा संवर्धन, नवीन ऊर्जा स्त्रोत, जलसंवर्धन, सांडपाणी- कचरा व्यवस्थापन, जल- वायू प्रदूषण नियंत्रण आदि विषय घेऊन नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांमधील विविध माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर केले. प्रदर्शनाचे उद्घाटन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव एम. व्ही. कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष काशीनाथ टर्ले, डॉ. केशव नांदूरकर, प्राचार्य प्रकाश कडवे, व्ही. आर. खपली आदि मान्यवर उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनात विजेच्या प्रथम, द्वितीय, तृतीय व तीन उत्तेजनार्थ प्रकल्पांना अनुक्र मे अकरा हजार रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, नऊ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र, सात हजार रुपये स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, प्रत्येकी तीन हजार रुपयांसह दोन विशेष पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. प्रदर्शनाचा निकाल गुरुवारी (दि.३१) घोषित करण्यात येणार असून, संध्याकाळी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. विभागातून विविध मराठी, इंग्रजी, उर्दू माध्यमांच्या शाळांमधील एकूण २३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून एकूण शंभर प्रकल्प मांडण्यात आले आहेत.