नाशिक शहरात २१ कोटींची स्मार्ट लायटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 01:01 AM2018-08-18T01:01:33+5:302018-08-18T01:01:51+5:30
शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे.
नाशिक : शहरात असलेल्या ८२ हजार विद्युत पथदीपांची अवस्था आता सुधारणार असून, स्मार्ट सिटी अंतर्गत अद्ययावत पथदीप बसविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे मागासवर्गीय प्रभागातदेखील अडीच हजार पथदीप बसवण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात एलइडी पथदीप बसविण्याच्या नावाखाली शहरातील बहुतांशी रस्त्यावरील पथदीपांची देखभाल दुरुस्ती रखडली होती, महापालिकेच्या स्थायी समितीच्या आणि प्रभाग समित्यांमध्ये अनेकदा हा विषय गाजला होता. मनसेच्या कारकिर्दीत एलइडी घोटाळ्याचा विषय थांबला असला तरी ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतल्याने हा विषय प्रलंबित होता. दरम्यान, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धता या त्रिसूत्रीच्या आधारे विद्युत विभागाच्या प्रलंबित विषयाला हात घातला. विशेषत: महापालिकेच्या अॅपवर येणाऱ्या तक्रारी आणि वॉक विथ कमिशनर या उपक्रमांच्या आधारे आलेल्या तक्रारींच्या आधारे त्यांनी आढावा घेतल्यानंतर पथदीपांच्या विषयांना प्राधान्य दिले. महापालिकेच्या २०१८-१९ या आर्थिक अंदाजपत्रकात विद्युती करणासाठी असलेल्या तरतुदीच्या आधारे सात कोटी ३० लाख रुपयांच्या रकमेची निविदा काढण्यात आली होती, ती सध्या कार्यवाहीत असून, याच महिन्याच्या आधारे याच महिन्याच्या अखेरीस पथदीप बसविण्यास प्रारंभ होणार आहे, याशिवाय मनपाच्या मागासवर्गीय प्रभागात २४८० पथदीप उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी ५ कोटी ३७ लाख रुपये खर्चाच्या निविदा काढण्यात येणार आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक व पंचवटीतील जुने गावठाण येथे २४३६ पथदीप उभारण्यात येणार असून, त्यासाठी ८ कोटी ६५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. त्याची निविदा प्रसिद्ध झाली असून, या वर्षाच्या अखेरीस ७५८५ नवे पथदीप उभारण्यात येतील, त्याचप्रमाणे सर्व जुन्या अस्तित्वातील खांबावरील जुने दिवे बदलून नवे एलइडी दिवे बसविण्यात येणार आहेत.