स्मार्ट पार्किंगचे प्रात्यक्षिक महापालिका : ३३ ठिकाणी पार्र्किंगचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 01:08 AM2018-04-07T01:08:39+5:302018-04-07T01:08:39+5:30
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे.
नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट, तर २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यातील पार्किंग सुरू करण्यापूर्वी त्याची चाचणी महापालिकेच्या राजीव गांधी भवन येथे शुक्रवारी (दि.६) घेण्यात आली. यावेळी बुम अॅरिअरसह पार्किंगचे दर, वाहनांसाठी मोकळी जागा याबाबतची माहिती डिजिटल डिस्प्लेद्वारे देण्यात आली तसेच मोबाइल अॅपचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महापालिका क्षेत्रात वाहनतळाचा विषय गंभीर असून, या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात ३३ ठिकाणी पार्किंग होणार आहे. आॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा आहे. याठिकाणी वाहनतळ डिजिटल केले जाणार असून, त्यांची जोडणी एका अॅपद्वारे मोबाइलशी केली जाणार आहे. त्याद्वारे वाहनधारक ज्या रस्त्यावर वाहने लावू इच्छितात, त्यांना जवळील महापालिकेचे वाहनतळ कोणते, तेथे पार्किंगचे दर काय आहेत, वाहनासाठी जागा शिल्लक आहे किंवा नाही याचीही माहिती मिळणार आहे. बारकोड पद्धतीचे तिकीट, अवघ्या तीस सेकंदात पार्किंगमधून बाहेर पडण्याची सोय याची चाचणी यावेळी करण्यात आली. त्यासाठी राजीव गांधी भवनातील पार्किंग, रामायण बंगल्यालगतचे वाहनतळ आदी ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.