स्मार्ट फोनने डायऱ्या, कॅलेंडरची बाजारपेठ केली काबीज, मागणी घटली : दैनंदिन कामाचे नियोजन मोबाइलवरच करण्याकडे कल वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 04:40 PM2018-01-02T16:40:35+5:302018-01-02T16:46:07+5:30
नाशिक : माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसागणिक होणाऱ्या क्रांतिकारी बदलांमुळे स्मार्ट फोनच्या माध्यमातून संपूर्ण जगत प्रत्येकाच्या हातात सामावल्याचे पहायला मिळत आहे. हातातल्या स्मार्ट फोनमध्ये रोज घडणाऱ्या घडामोडींसह वार्षिक कार्यक्रमांचे नियोजन आणि नोंदी ठेवणो शक्य झाले आहे. त्यामुळे तारीख, सण, वार पाहण्यासाठी भिंतीवरच्या कॅलेंडरकडे नजर टाकणारे व रोजच्या घडामोडींच्या नोंदी ठेवणारे अनेकजण त्यांची ही दैनंदिन कामे स्मार्ट फोनवरच करू लागल्याने कॅलेंडर व डायऱ्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे.
गेल्या काही वर्षात स्मार्ट फोन्सची बाजारपेठ बघता बघता विस्तारली असून ट्विटर, फेसबुक आणि व्हॉट्स अॅप आणि चॅटिंगचा पर्याय देणाऱ्या असंख्य सोशल साईट्स स्मार्ट फोनच्या एका क्लिकवर आल्या आहेत. त्याचबरोबर झपाटय़ाने नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून, हातातील स्मार्ट फोनमध्ये संगणकाप्रमाणे काम करण्याची क्षमता आली आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाज असो वा सणवार असो प्रत्येक गोष्टीचे नियोजन व नोंदी हातातल्या स्मार्ट फोनमध्ये सामावल्या आहेत. त्यामुळे पयार्याने डायऱ्या व कॅलेंडरची गरज कमी झाल्याने त्यांचा ग्राहक वर्गही घटला असून, या डायऱ्या व कॅलेंडरची बाजारपेठ स्मार्ट फोनने काबीज केली आहे. सोशल साईटचा प्रचार होण्यासाठी स्वस्त दराने इंटरनेटची उपलब्धता, कमी किमतीतील अधिक फिचर्स असलेले स्मार्ट फोन, संवाद साधण्यात आलेली गती व विविध मोबाइल अॅप या कारणांमुळे तरु णाईच नव्हे, तर समाजातील लहान-थोरांसह सर्वच घटक स्मार्ट फोनकडे आकर्षित होत आहेत. ग्राहकवर्गाची वाढलेली गरज हे भारतीय कंपन्यांसह परदेशी कंपन्यांनीही चांगलेच हेरले आहे. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठ काबीज करण्यासाठी बहुतांश मोबाइल उत्पादक व ऑपरेटर कंपन्यांची चढाओढ लागली. अगदी स्वस्तात मोबाइल आणि हवे तसे इंटरनेट प्लॅन खास तयार केले जात आहे. ग्राहक मिळविण्यासाठी नेटवर्किग कंपन्यांचे जाळेही शहरासह ग्रामीण वाडय़ा-वस्त्यांकडे तयार झाले आहे. केवळ संवादाचे माध्यम नव्हे, तर बहुपयोगी झालेल्या स्मार्ट फोनने कॅलेंडर आणि डाय:यांची गरजच कमी केल्याने पयार्याने बाजारातही या वस्तूंचा ग्राहक कमी झाला आहे. नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर भेटवस्तू म्हणून दिल्या जाणाऱ्या डायऱ्याना मागणी असली तरी वैयक्तिक वापरासाठी डायऱ्या घेणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत घट झाल्याची प्रतिक्रिया स्टेशनरी विक्रेत्यांकडून व्यक्त होत असून, कॅलेंडरच्या विक्रीतही मोठय़ा प्रमाणात घट झाल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे.