माळवाडी ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्राम पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:15 AM2021-09-27T04:15:14+5:302021-09-27T04:15:14+5:30
सन २०२०-२१ ह्या आर्थिक वर्षात आर.आर. पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार योजनेत देवळा तालुक्यातील माळवाडीसह अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला ...
सन २०२०-२१ ह्या आर्थिक वर्षात आर.आर. पाटील तालुका सुंदर गाव पुरस्कार योजनेत देवळा तालुक्यातील माळवाडीसह अनेक ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. परंतु माळवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी बागुल, ग्रामसेवक संभाजी देवरे व ग्रामपंचायत सदस्यांनी परिश्रम घेत गावात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, उत्तरदायित्व, अपारंपरिक ऊर्जा साधनांचा उपयोग, तसेच ग्रामपंचायतीच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यात झालेल्या तपासणीत गुणांकानुसार देवळा तालुक्यात माळवाडी ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक पटकावला. विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार देण्यात आला. सरपंच शिवाजी बागुल व ग्रामसेवक संभाजी देवरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. प्रमाणपत्र व १० लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, देवळा पंचायत समितीच्या सभापती शांताबाई पवार, गटविकास अधिकारी राजेश देशमुख आदींसह अन्य कार्यालयाचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.