मौजे सुकेणे ठरले निफाड तालुक्यातील ‘स्मार्ट गाव’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:10 AM2018-03-03T00:10:45+5:302018-03-03T00:10:45+5:30
राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.
कसबे सुकेणे : राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेत निफाड तालुक्यातून मौजे सुकेणे गावाने बाजी मारत दहा लाखांचा पुरस्कार प्राप्त केला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे १२५, तर निफाड तालुक्यातून १५ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता. राज्य शासनाच्या स्मार्ट ग्राम स्पर्धेचे सर्व निकष पूर्ण केल्याने मौजे सुकेणे गावाला स्मार्ट गावाचा बहुमान प्राप्त होऊन सुमारे दहा लाखांचा पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती सरपंच वृषाली भंडारे, ग्रामविकास अधिकारी श्रीमती एस. जी. सनेर यांनी दिली. दत्त मंदिर देवस्थानासाठी प्रसिद्ध अस-लेल्या श्रीक्षेत्र मौजे सुकेणे गावाला आता स्मार्ट गावाच्या बहुमानाचे कोंदण लाभले आहे. लोकसहभाग आणि स्वच्छतेकडून समृद्धीकडे असा प्रवास करणाºया गावाने या योजनेसाठी वैयक्तिक शौचालय सुविधा व वापर, सार्वजनिक इमारतीतील शौचालय सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी, घनकचरा, पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधा, केंद्र व राज्य पुरस्कार योजनांची अंमलबजावणी, महिलांचे बचतगट, प्लॅस्टिक वापर बंदी, वीजबिल भरणा, लेखा परीक्षण पूर्तता, ग्रामसभेचे आयोजन, लोकसहभाग, सौर पथदीप, एलईडी दिव्यांचा वापर, बॉयोगॅस यंत्रांचा वापर, वृक्षलागवड, जलसंधारण, संगणकीकरण सुविधा या सर्व निकषांची पूर्तता केल्याने मौजे सुकेणेची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी व ग्रामविकासासाठी माजी सरपंच सुरेखा गडाख, सरपंच वृषाली भंडारे, नंदराम हांडोरे, विजय मोगल, संतु काळे, कावेरी मोगल, विमल भोई, भारती चव्हाण, शीला पारधे, संदेश मोगल, नंदू भोई यांनी परिश्रम घेतले, अशी माहिती विराज पाटील यांनी दिली.
लोकसहभागामुळे यश
मौजे सुकेणे गावाला स्मार्ट गाव पुरस्काराचा बहुमान हा लोकसहभाग आणि संपुर्ण गावाच्या सहकार्यामुळेच लाभला आहे. राज्यातील एक आदर्श स्मार्ट गाव साकारण्याचा आमचा मानस आहे. - वृषाली भंडारे, सरपंच मौजे सुकेणे गावाने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही तृतीय क्रमांकाचे पाच लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. गत पाच वर्षांत मौजे सुकेणे ग्रामपंचायतीला चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. क वर्ग तीर्थस्थळ व पर्यटनस्थळ विकास योजनेतूनही विविध विकासकामे प्रस्तावित असल्याची माहिती ग्रामपंचायत प्रशासनाने दिली.