स्मार्ट रस्ता की....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:46+5:302021-06-24T04:11:46+5:30
नाशिक : नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्यानंतर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला शहरातील पहिला वहिला स्मार्टरोड ...
नाशिक : नाशिक महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आल्यानंतर मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेला शहरातील पहिला वहिला स्मार्टरोड गेल्या तीन वर्षांनंतरही स्मार्ट रस्त्यांतर्गत नमूद केलेल्या सर्व सुविधांनी पूर्ण होऊ शकलेला नाही. अशोक स्तंभ ते जुना त्र्यंबक नाका या शहरात सर्वाधिक वर्दळीच्या व महत्त्वाच्या असलेल्या रस्त्याची निवड करतानाच मोठा गजहब झाला. परंतु महापालिकेने आपला हेका कायम ठेवल्याने वाहतुकीसाठी जवळपास वर्ष-दीड वर्ष हा रस्ता बंद ठेवून ठेकेदाराने काम सुरू ठेवले. साधारणत: एक किलोमीटर अंतर असलेल्या व कोट्यवधी रुपये खर्च केलेल्या या ‘स्मार्ट’ रस्त्याच्या उभारणीत सायकल ट्रॅक, अद्ययावत फूटपाथ, निवारा शेड, आकर्षक विद्युत व्यवस्था, वाय-फायची सुविधा, ई-टॉयलेट, वाहन पार्किंग, भूमिगत वीज जोडणी आदी अनेक सोयी, सुविधा पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत.
चौकट====
सोयींऐवजी गैरसोयीच अधिक
सध्या हा स्मार्ट रस्ता चकाचक दिसत असला तरी, त्याच्या कामाच्या दर्जाबाबत अजूनही तक्रारी कायम असून, त्यातूनच ठेकेदारावर वेळोवेळी महापालिका प्रशासनाने दंडात्मक कारवाई देखील केली आहे. रस्त्यावरून मार्गक्रमण करताना वाहनाला बसणारे हिसके, फूटपाथच्या जागेवर दुचाकी चालकांनी केलेले अतिक्रमण व त्याला मिळालेला वाहनतळाचा दर्जा, पादचाऱ्यांसाठी बसविलेल्या बाकांचा विक्रेत्यांनी घेतलेला ताबा, सायकल ट्रॅकच्या जागेवर चारचाकी वाहनांचे पार्किंग अशा एक नव्हे तर अनेक समस्यांनी स्मार्ट रस्ता जर्जर बनला आहे.
चौकट
===
आंदोलनांमुळे रस्ता खुला
शहरातील अतिशय वर्दळीच्या व बाजारपेठेशी संलग्न असलेल्या या स्मार्ट रस्त्याचे काम अनेक वर्षे रखडल्याने त्याचा नाशिककरांना त्रास तर सहन करावा लागलाच, परंतु या रस्त्यावर दुतर्फा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचेही अतोनात हाल झाले. पेट्रोल पंप, बँका, लॉजिंग, रेस्टॉरंट, मेडिकल दुकानांबरोबरच बस स्थानक, जिल्हा न्यायालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशी अनेक महत्त्वाची ठिकाणे याच रस्त्यावर होती. जोपर्यंत रस्त्याचे काम चालले, तोपर्यंत साऱ्यांनाच त्रास सहन करावा लागला, शिवाय व्यावसायिक नुकसानही झाले. अखेर येथील व्यावसायिकांना आंदोलनाचे अस्त्र उपसावे लागले. त्यानंतर दबावातून महापालिकेने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
चौकट
====
अन्य रस्त्यांबाबत मौन
स्मार्ट सिटीत समावेश झालेल्या नाशिक महापालिकेचे सर्वच रस्ते टप्पा-टप्प्याने ‘स्मार्ट’ करण्यात येणार असले तरी, एकमेव पहिल्याच रस्त्याने महापालिका व रस्ता तयार करणारा ठेकेदार जर्जर बनल्याने अन्य रस्त्यांबाबत सध्या तरी मौन बाळगले जात असून, जुना त्र्यंबक नाका ते एबीबी सर्कल यादरम्यान दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट रस्त्याचे काम केले जाणार असल्याचे जाहीरही करण्यात आले होते. परंतु या मार्गावरही वाहतुकीची असलेली वर्दळ पाहता, काम सुरू करण्याबाबत महापालिकाच मागे-पुढे करीत असल्याचे जाणवते.
रस्त्यावर काय नाही...
* स्मार्ट रस्त्यावर वायफाय सुविधा देण्याचे जाहीर करण्यात आले होते, प्रत्यक्षात ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही.
* या रस्त्यावर सायकल चालकांसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करण्यात आला आहे, प्रत्यक्षात ट्रॅक तयार आहे, मात्र त्याच्या जागेवर चारचाकी वाहनांचे पार्किंग केले जाते.
* पादचाऱ्यांसाठी फूटपाथ आहे, परंतु या फूटपाथवर दुकानदारांचे अतिक्रमण तसेच दुचाकीचे वाहनतळ तयार झाले आहे.
* स्मार्ट रस्त्यावर ई-टॉयलेटची सुविधा देण्यात येणार होती, परंतु जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर विरोध केल्याने ई-टॉयलेट गायब झाले आहे.
* स्मार्ट रस्त्यावर भूमिगत वीज जोडणी देण्यात येणार होती. प्रत्यक्षात भूमिगत जोडणी झालेली नाही.