'स्मार्टसिटी : मेनरोडवरील वाहतूक मार्गात बदल; कालिदाससमोरील रस्त्यावर एकेरी वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:49 PM2020-07-09T17:49:11+5:302020-07-09T17:59:54+5:30
काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे.
नाशिक : स्मार्टसिटीअंतर्गत पहिल्या टप्प्यात मेनरोडवरील धुमाळ पॉइंट अर्थात वंदे मातरम चौकापासून जिजामाता चौकापर्यंतचा रस्ता विकसीत करण्यात येणार आहे.
स्मार्टसिटीअंतर्गत केल्या जाणाऱ्या रस्ते विकासाच्या कामामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून वाहतूक मार्गात बदलाची अधिसूचना काढण्यात आली आहे. स्मार्टसिटीच्या कामाला अडथळा होऊ नये, यासाठी पहिल्या टप्प्यात जिजामाता चौकापासून ते गाडगेमहाराज पुलाकडे जाणा-या दहीपूलाच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच दुस-या टप्प्यात वंदे मातरम चौक (धुमाळ पॉइंट) ते जिजामाता चौकापर्यंतच्या कामाला प्रारंभ केला जाणार आहे. यामुळे या भागातही वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे, असे उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे; मात्र पावसाळ्यात या गजबजलेल्या परिसरात ही कामे हाती घेणे कितपत योग्य आहे? असा सवाल या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. एकीकडे लॉकडाऊन काळात व्यवासाय पुर्णत: ठप्प झाला होता. काही दिवसांपासून पुन्हा व्यवसाय पुर्वपदावर येत असताना हा स्मार्टसिटीच्या रस्त्यांच्या कामाचा या भागात नारळ फूटणार असल्यामुळे व्यावसायिक वर्गही धास्तावला आहे. एकीकडे पावसाळा दुसरीकडे स्मार्टसिटीअंतर्गत सुरू होणारे रस्त्याचे काम अशा दुहेरी कात्रीत या भागातील व्यावसायिक सापडण्याची शक्यता आहे.
पर्यायी मार्ग असा...
* मेनरोडवरील वंदे मातरम चौकाकडून जिजामाता चौकाकडे जाणाºया वाहनांनी थेट गाडगे महाराज पुतळामार्गे विजयानंद चित्रपटगृहासमोरून थेट साक्षी गणेश मंदिरामार्गे पुढे मार्गस्थ होतील.
* तसेच रविवार कारंजावरून खाली येत बोहरपट्टीकडे वळण घेत सराफ बाजारातून पुढे पर्यायी मार्गाने वाहनचालकांना जाता येईल, असे अधिसूचनेत म्हटले आहे. या अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांविरूध्द मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘नो पार्किंग-हॉल्टींग झोन’
स्मार्टसिटीअंतर्गत या भागात करण्यात येणाºया रस्त्याच्या कामामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होऊ नये म्हणून आता वाहतूक शाखेने वंदे मातरम चौक ते जिजामाता चौक आणि सराफ बाजार (सरस्वती लेन) ते थेट बादशाही कॉर्नर (भद्रकाली) पर्यंत कुठल्याही प्रकारच्या वाहने पार्किंग करता येणार नाही आणि वाहनांना या मार्गावर थांबण्यासही बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांविरूध्द पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.
कालिदास कलामंदिरासमोरील रस्त्यावर एकेरी वाहतूक
स्मार्टसिटीअंतर्गत अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर थेट महात्माफुले कलादालनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला ऐन पावसाळ्यात प्रारंभ केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्याची उजवी आणि त्यानंतर डावी बाजू अशा दोन टप्प्यात हा रस्ता विकसीत करण्यात येणार असल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक यापुढे एकेरी होईल, अशी अधिसूचना शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.
अण्णा भाऊ साठे पुतळ्यापासून तर थेट महात्मा फुले कलादालन भालेकर मैदानासमोरील बाजूने रस्त्याच्या कामाला सुरूवात होत आहे. यामुळे त्याच्या विरूध्द बाजूने कालिदाससमोरून एकरी वाहतूक सुरू राहणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले आहे. ही अधिसूचना रस्त्याचे काम पुर्णत्वास येईपर्यंत लागू राहणार असल्याचे वाहतूक शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वाहनचालकांनी शिवसेना कार्यालयाकडून जिल्हा परिषदेकडे जाण्यासाठी वरील रस्त्यांचा वापर पुर्णपणे थांबवावा त्याऐवजी शालिमारवरून सीबीएसमार्गे त्र्यंबकनाका सिग्नलवरून वळण घेत जिल्हा परिषदेकडे यावे. अण्णा भाऊ साठे चौकापासून तर थेट शिवसेना कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावर कुठल्याहीप्रकारची वाहने उभी केली जाणार नाही व कोणतेही वाहन रस्त्यांवर कुठल्याही कारणास्तव थांबणार नाही, हा संपूर्ण भाग नो पार्किंग-हॉल्टींग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.