‘धुंद करील गतकालीन  शिल्प येथे सहज तुला...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:45 AM2019-05-18T00:45:01+5:302019-05-18T00:45:43+5:30

शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे़ तद्वतच धार्मिक परंपरादेखील लाभलेली आहे़ साहजिकच येथे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू (इमारती) आहेत़ त्याचप्रमाणे त्या काळातील त्या काळातील मातीची भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू, युद्धकाळात वापरातील ढाल, तलवारी आदी मोठ्या प्रमाणावर आढळतात़ या वस्तू जतन करून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी वस्तू संग्रहालये उभारण्यात आली आहेत़ परंतु समृद्ध परंपरा लाभलेल्या या वारशाला नागरिक आणि पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही़

 'Smooth-time dirt crafts can be easily accessible ...' | ‘धुंद करील गतकालीन  शिल्प येथे सहज तुला...’

‘धुंद करील गतकालीन  शिल्प येथे सहज तुला...’

googlenewsNext

नाशिक : शहराला प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे़ तद्वतच धार्मिक परंपरादेखील लाभलेली आहे़ साहजिकच येथे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू (इमारती) आहेत़ त्याचप्रमाणे त्या काळातील त्या काळातील मातीची भांडी, दैनंदिन वापरातील वस्तू, युद्धकाळात वापरातील ढाल, तलवारी आदी मोठ्या प्रमाणावर आढळतात़ या वस्तू जतन करून ठेवण्यासाठी अनेक ठिकाणी वस्तू संग्रहालये उभारण्यात आली आहेत़ परंतु समृद्ध परंपरा लाभलेल्या या वारशाला नागरिक आणि पर्यटकांचा फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही़ जागतिक संग्रहालय दिनानिमित्त शहरातील वस्तूसंग्रहालयाचा थोडक्यात घेतलेला मागोवा़
सरकारवाड्यात वस्तूसंग्रहालयाचे खुलले सौंदर्य
पाचव्या शतकापासून १२व्या शतकापर्यंतच्या विविध पाषाण जैन तीर्थंकारांचे शिल्प अन् हिंदू देव-देवतांच्या मूर्ती तसेच सातवाहन काळापासून ते मराठा-मुघल काळात वापरात आलेली शस्त्रास्त्रे व नाण्यांचा खजिना, नाशिक विभागात उदयास आलेल्या विविध संस्कृती आणि सत्ताकाळातील इतिहास टप्प्याटप्प्याने जिवंत करत जातो. म्हणूनच संग्रहालयाविषयी कवी गंगाधर केळकर ऊर्फ अज्ञातवासी यांनी ‘विसर मला पण न विसर ही येथील अमर कला, धुंद करील गतकालीन शिल्प येथे सहज तुला...’ असे गौरवोद्गार काढले आहेत.
पूर्वजांचा ठेवारूपी वारसा जपला जावा व भावी पिढीसमोर इतिहास जिवंत रहावा या उद्देशाने ११ आॅक्टोबर १९८५ साली राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालयाने प्रादेशिक वस्तूसंग्रहालय स्थापन केले. काही काळ ठेवा फाळके स्मारकात पोहचला. २००५ सालापासून २०१८ पर्यंत फाळके स्मारकात वस्तू संग्रहालय सुरू होते. यानंतर सरकारवाड्याचे जतन व संवर्धनाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाल्याने गेल्या वर्षी २६ डिसेंबर रोजी संग्रहालय हक्काच्या सरकारवाड्यात पोहचले. ऐतिहासिक अशा पुरातन राज्य संरक्षित वास्तूत दुर्मीळ ठेवा आल्याने सरकारवाड्याचे सौंदर्यही अधिक खुलले.
विविध देवतांचे पाषाण शिल्प
पाषाण शिल्प दालन : धरणगाव येथील जैन मूर्ती ज्या पद्मासनस्थ योगमुद्रेतील तीर्थंकार, उभे तीर्थंकार, बाहुबली आदी. तोंडापूर येथील पाषाण मूर्ती, गणपती आदी मूर्ती गोळा केल्या तसेच विंचूर संस्थानिकांकडून ठासणीच्या बंदुका, तलवारी, ढाल व अन्य हत्त्यारे संग्रहालयाला विनामूल्य भेट म्हणून देण्यात आली. त्यामुळे शस्त्रास्त्रे दालन येथे सुरू होऊ शकले. पाषाण शिल्प दालनातील जैन, बुद्ध प्रतिमा, गणपती, चामुंडा, विष्णू, वासुदेव आदी देवतांचे पाषाण शिल्प दिमाखात पहावयास मिळतात.
सावानाच्या मानाचा तुरा : वस्तूसंग्रहालय
सार्वजनिक वाचनालय नाशिक या संस्थेच्या शिरे पेचातील एक मानाचा तुरा म्हणजे प्राचीन वस्तुंचे भांडार होय़ सदर वास्तुसंग्रहालय हे दि़ १२ फेब्रुवारी २००४ रोजी अद्ययावत अशा दालनात हलविण्यात आले आहे़ या दालनात विविध वस्तूंचे वेगवेगळे सुमारे १५ विभाग करण्यात आले आहेत़ यात पाषाण व काष्ठ शिल्पे, शस्त्रागार, धातूच्या देव मूर्ती, धातूच्या कलात्मक वस्तू, पुरातत्त्व व अभिलेखागार चित्रकला, काचचित्रे, नाणे व तिकीट विभाग नाशिकची साहित्य परंपरा आदींचा समावेश आहे़
ऐतिहासिक वस्तूंचा खजिना सर्वांना पाहता यावा, या उद्देशाने वाचनालयाने तळमजल्यावरच अद्ययावत सुविधांनी युक्त असे वास्तुसंग्रहालय उभारले आहे़ वास्तूसंग्रहायाचे दालन सुसज्ज होण्यासाठी जेठारामभाई बटाविया यांनी स्वत:जवळील असलेल्या अनेक अमुल्य वस्तू देणगी म्हणून येथे दिलेल्या आहेत़ श्री गणेश, शिव आणि विष्णु यांच्या विविध रुपातील मूर्ती या नरहर बापट आणि ललिता बापट यांच्याकडून विष्णू दामोदर साने आणि साने परिवार यांच्या स्मरणार्थ मिळाल्या आहेत़ यात गणेशाची विविध रुपे प्रेक्षकांना भावणारी आहेत़ तसेच शिवपार्वती आणि विष्णूची मूर्तीदेखील रेखीव व आकर्षक आहेत़ तसेच दिवे विभागात दिपलक्ष्मी, पंचारती आदी प्रकार आहेत़ तर पुरातत्त्व विभागात मातीच्या भांडी, माठ असे प्रकार आहेत़ खेळण्यामध्ये हत्ती, घोडा आदी खेळणी असून गृहोपयोगी वस्तू व भांडीदेखील वस्तूसंग्रहालयाची शोभा वाढवितात़

Web Title:  'Smooth-time dirt crafts can be easily accessible ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.