‘भेटकार्ड’पुढे एसएमएस पडले फिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:53 AM2017-10-27T00:53:43+5:302017-10-27T00:53:51+5:30
संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे.
नाशिक : संपर्क साधनांचे अनेक आधुनिक पर्याय उपलब्ध असल्याने टपालाच्या माध्यमातून दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविणे कालबाह्य झाल्याची चर्चा होत असताना आधुनिक साधनांचा वापर करणाºयांनीच ही चर्चा वायफळ ठरविली आहे. यावर्षी टपाल खात्याच्या माध्यमातून सुमारे ५५ हजारापेक्षा अधिक भेटकार्डे एकमेकांना पाठविण्यात आली आहेत. यामध्ये छापील भेटकार्डाबरोबरच पोस्ट कार्डावरील मजकूर आणि हाताने रेखाटलेल्या चित्रांचा समावेश असलेल्या भेटकार्डांचा समावेश अधिक होता.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि या साधनांचा वापर करून संपर्कात रहाणे ‘स्टेटस’ मानले जात असताना भेटकार्डाच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा पाठविणाºयांची संख्याही कमी नसल्याचे समोर आले आहे. आजकाल कोणताही सण, सोहळा आणि उत्सवात एकमेकांना शुभेच्छा पाठविण्याची क्रेझ आहे. एका क्लिकवर सारे काही होत असल्याने काही क्षणातील ही देवाण-घेवाण संख्यात्मक पातळी गाठते. परंतु ती मनाला भिडतेच याबाबत शाश्वती कुणीही देऊ शकत नाही. किंबहुना अशा शुभेच्छांचा संचय करणे शक्य होईलच किंवा त्या मांडून ठेवणेही शक्य नसल्याने आकर्षक रंगसंगती, चित्र, देखावा आणि संदेशाच्या अर्थपूर्ण ओळी असलेली भेटकार्डे अनेकांना भावली आहेत. त्यामुळेच यंदा भेटकार्ड पाठविणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून येते. नाशिक टपाल कार्यालयातून यावर्षी दिवाळीचे शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठीची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यास नाशिककरांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, ५५ हजारापेक्षा जास्त भेटकार्डे नातेवाइकांना एकमेकांना पाठविली आहेत. यामध्ये तयार भेटकार्डांबरोबरच हाताने लिहिलेले शुभेच्छा संदेशांचे पोस्टकार्ड आणि आंतरदेशीपत्रांचाही समावेश होता. वरवर टपाल खात्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली असल्याचे बोलले जात असताना शुभेच्छा संदेश पाठविण्यासाठी टपाल खात्यासमोर गर्दी झाल्याने टपाल खात्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.