मांडुळ तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2021 04:46 PM2021-01-27T16:46:39+5:302021-01-27T16:47:04+5:30
पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या.
नाशिक : मांडुळ या सर्पाची तस्करी करण्यासाठी एका मांडुळाला आपल्या घरात डांबून ठेवणाऱ्या तस्कराला मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्या घरातुन पुर्ण वाढ झालेले एक मांडूळ वन्यजीव जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, तपोवन रस्त्यावर एका मॉलच्या जवळ सर्प तस्कर मांडुळ जातीचा सर्प घेऊन विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त बातमी गुन्हे शाखेचे उपनिरिक्षक महेश शिंदे यांना मिळाली. त्यांनी याबाबत तत्काळ वरिष्ठ पालीस निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांना कळविले. त्यांच्या आदेशान्वये पथकाने या ठिकाणी सापळा रचला. संशयित सर्प तस्कर रमेश वसंत लकारे (२५,रा.इंदिरा घरकुल, करंजवन, ता.दिंडोरी) हा संशयास्पदरित्या बॅग घेऊन आला. यावेळी पथकाने शिताफीने रमेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत स्वत:जवळ असलेल्या एका प्लॅस्टिकची गोणीची झडती घेण्यास नकार दिला. पोलिसांनी खाकीचा हिसका दाखविताच त्याने गोणी खोलून दाखविले असता त्यामध्ये एका मांडूळ जातीचा जीवंत सर्प आढळून आला. पथकाने पंचांसमक्ष पंचनामा करत मांडुळ जप्त केले तसेच त्यास बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या पथकाने पुढील कारवाईसाठी वन्यजीव तस्कर रमेश व त्याच्याजवळ आढळून आलेला सर्प नाशिक पश्चिम वनविभागाकडे सोपविला आहे. वनपरिक्षेत्रअधिकारी विवेक भदाणे हे याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.