वाळूची चोरटी वाहतूक; ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 06:53 PM2020-04-30T18:53:07+5:302020-04-30T18:53:38+5:30
सिन्नर : मिरगाव शिवारात जामनदी पात्रातून वाळूचे अवैध खोदकाम करून चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे.
सिन्नर : मिरगाव शिवारात जामनदी पात्रातून वाळूचे अवैध खोदकाम करून चोरटी वाहतूक सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार राहुल कोताडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी एकत्रित कारवाई करून शिर्डी महामार्गावरून वाळूने भरलेला ट्रक रात्री पकडला.
मिरगाव शिवारात गेल्या अनेक वर्षांपासून वाळूचा बेकायदा उपसा सुरू आहे. यात स्थानिक व बाहेरील व्यक्ती असल्याचे वारंवार उघड झाले आहे. या वाळू चोरांवर कारवाई करण्याची मागणी अनेकदा करण्यात येत होती. मात्र, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत होते. सध्या देशभर लॉकडाउन असल्याने व प्रशासकीय यंत्रणा कोरोना उपाययोजनांमध्ये व्यस्त असल्याने वाळू माफियांनी आपला मोर्चा मिरगावच्या नदीपात्राकडे वळवला आहे. जाम नदीतून अवैध खोदकाम करून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर तहसीलदार कोताडे यांनी वावीचे सहाय्यक निरीक्षक गलांडे यांच्या मदतीने उपसा होणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्याचे नियोजन केले होते.
हा ट्रक थांबवून तहसीलदारांनी तपासणी केली असता मिरगाव येथून वाळू भरून सिन्नरच्या दिशेने जात असल्याचे चालकाने सांगितले. सदरचा ट्रक जप्त करून तहसीलदार कोताडे यांनी वावी पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.
तहसीलदारांची कारवाई
वावी येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास शहा गावाकडून पोलीस पथकासह तहसीलदारांचे वाहन जात असताना वाळू चोरांना सुगावा लागला. त्यामुळे सर्वांची पळापळ झाली. याच दरम्यान शिर्डी महामार्गावरून वावीच्या दिशेने जाणारा (एमएच १५ डीके ४२१७) हा बेंझ कंपनीचा ट्रक पथकाच्या निदर्शनास पडला.