गुजरातच्या सीमारेषेवर खैरवृक्षाची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 06:30 PM2019-12-20T18:30:43+5:302019-12-20T18:31:07+5:30
कारवाई : तस्करांकडून मुद्देमालासह वाहन जप्त
पेठ : महाराष्ट्र व गुजरात सीमारेषेवरील दुर्गम अशा देवडोंगरी गावाजवळ खैर वृक्षाची अवैध कत्तल करून तस्करीच्या उद्देशाने वाहतूक करतांनाचे वाहन वनविभागाच्या गस्ती पथकाने संशयावरून अडवले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी वाहन सोडून पलायन केले.
हरसुल व पेठच्या जंगलातून रात्रीचे वेळी हरसूल रेंजचे वनक्षेत्रपाल के. व्ही. सूर्यवंशी, के.एस. एकशिंगे, वनरक्षक एन.एस.पाटील, एम.एस. परडे , आनंदा पवार व वनमजूर रात्रीचे वेळी गस्त घालत असतांना रस्त्यावर आयशर कंपनीचा टेम्पो आढळून आला . गस्ती पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन तस्कर फरार झाले . वाहनाची तपासणी केली असता त्यात बेकायदा कत्तल केलेले खैर वृक्षाचे ओंडके आढळून आले. मालाचे मोजमाप केले असता ०.८१ घनमीटर व त्याचे मुल्य ९८०० रुपये आणि वाहनाचे मूल्य १ लाख ९० हजार रूपये असा एकूण दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला .विभागीय व्यवस्थापक यु.सी. ढगे, सहाय्यकव्यवस्थापक एस.एच.वाजे यांचे मार्गदर्शनाखाली बोरीपाडाचे वनक्षेत्रपाल सी.आर.ढोबळ , झरी वनक्षेत्राचे एम.पी.जोशी, वनमजूर यांनीही सहकार्य केल्याने मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला .