साकोरा येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 01:59 AM2018-04-17T01:59:21+5:302018-04-17T01:59:21+5:30
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे सर्पदंशाने एका युवकाचा आज दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र रघुनाथ मोरे (३५) असे त्याचे नाव आहे.
साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे सर्पदंशाने एका युवकाचा आज दुपारी मृत्यू झाल्याची घटना घडली. रवींद्र रघुनाथ मोरे (३५) असे त्याचे नाव आहे. अर्जुन सुलाने यांच्या घरात सकाळी नागीण निघाल्याची वार्ता कळताच रवींद्र त्यांच्या घरात गेला. शर्तीचे प्रयत्प करून त्याने नागीणला पकडले. त्यानंतर दुपारी शेळ्या चारण्यासाठी संबंधित ठिकाणाहून काही अंतरावर नामदेव बोरसे यांच्या शेताजवळील नाल्यात गेला. रवींद्रला तेथेही एक नाग दिसल्याने त्याला पकडण्यासाठी तो धावला; परंतु प्रसंगावधान न बाळगल्याने त्या नागाने त्याच्या हाताला दोन ठिकाणी दंश केले. त्यानंतर रवींद्र थोडा अत्यवस्थ झाला. अशा अवस्थेत तो जवळच असलेल्या पेडकाई माता माध्यमिक विद्यालयात आला व तेथे पाण्याच्या टाकीवर पाणी पिऊन हात धुतला. तेवढ्यात मुख्याध्यापक योगेश पाटील तसेच काही शिक्षकांच्या लक्षात ही गोष्ट लक्षात आली. शिपाई भारत बोरसे यांनी त्याच्या हातावर ब्लेड मारण्याचा प्रयत्न केला. परंतु रवींद्रने नकार दिला. नंतर त्याच्या हाताच्या मागील बाजूस दोरी बांधून एका शिक्षकांसह ग्रामीण रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र परिस्थिती गंभीर असल्याचे पाहून त्याला मालेगाव येथे हलविण्यात आले. तेथेच त्याची प्राणज्योत मालवली. सोमवारी सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रवींद्र यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.