शस्त्र संग्रहालयाचा परिसर झाला सर्प संग्रहालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:38+5:302021-07-30T04:15:38+5:30
नाशिक : शिवसेना प्रमुखांचे नाव आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली शिवकालीन शस्त्रे... नाशिकच्या वैभवात भर घालणारे संग्रहालय राज ...
नाशिक : शिवसेना प्रमुखांचे नाव आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी दिलेली शिवकालीन शस्त्रे... नाशिकच्या वैभवात भर घालणारे संग्रहालय राज ठाकरे यांनी साकारले खरे; परंतु कोरोनामुळे दोन वर्षांपासून बंद असलेल्या संग्रहालयाच्या परिसरात मात्र अत्यंत बिकटावस्था निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांत या परिसराची साफसफाई झालेली नाही की गवत काढलेले नाही. पालापाचोळा जैसे थे आहे, त्यामुळे हा शस्त्र संग्रहालयाचा परिसर सर्प संग्रहालय झाल्याचा धक्कादायक प्रकार मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात उघड झाला.
मनसेच्या सत्ता काळात साकारलेल्या अनेक प्रकल्पांची दुरवस्था झाली असून, गुरुवारी (दि.२९) अमित ठाकरे यांनी त्याची स्थिती पाहण्यासाठी विविध प्रकल्पांना भेटी दिल्या. यात शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे शस्त्र संग्रहालयाचा समावेश हाेता. अमित यांनी त्याठिकाणी भेटी देत असल्याचे कळताच परिसरातील अनेक नागरिक तेथे आले आणि त्यांनी समस्या मांडल्या. कोरोनामुळे दोन वर्षांपासून संग्रहालय बंद असून, त्यामुळे महापालिकेचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. शस्त्र संग्रहालयाच्या परिसरात दोन वर्षांत साफसफाई झाली नाही. पालापाचोळा प्रचंड साचला असून, तो उचलला गेलेला नाही. परिसरात दुर्गंधी आहे. तसेच गवत आणि पालपोचाळ्यामुळे सापांचा सुळसुळाट आहे. वीज पुरवठा बंद झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. संग्रहालय आणि उद्यानाचे प्रवेशद्वार एकच आहे. संग्रहालय खुले असेल तर तेव्हा मोठ्या नागरिकांसाठी २०, तर विद्यार्थ्यांसाठी १० रुपये शुल्क घेतले जाते. त्यामुळे उद्यानात जाणाऱ्यांना अकारण तिकिटाचा भुर्दंड सहन करावा लागतो, असेही नागरिकांनी सांगितले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत सुधारणा करू, असे अश्वासन त्यांनी दिले.
दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाण पुलाखालील सुंदर रेखाटलेल्या चित्रांची दुरवस्था, बॉटनीकल गार्डन या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या.
इन्फो...
नाशिक फस्ट कंपनीच्या वतीने तिडके कॉलनीत साकारलेल्या चिल्ड्रन ट्रॅफिक पार्कसाठी महापालिकेने रेेडीरेकनरनुसार भाडे ठरवले असून, ते कमी करावे, अशी मागणी अमित ठाकरे यांच्या दौऱ्यात करण्यात आली. राज ठाकरे मिळकतींच्या दराबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करतील आणि तोडगा काढतील, तोपर्यंत संस्थेवर कारवाई करू नये, असे संदीप देशपांडे यांनी महापालिका आयुक्तांना सांगितले.
इन्फो...
आता विनवणी, नंतर मनसे स्टाईल...
मनसेच्या सत्ता काळातील वॉटर कर्टन, गोदापार्क, शस्त्र संग्रहालय तसेच उड्डाणपुलाखालील चित्रे यांची दुरवस्था झाली आहे, त्याकडे महापालिकेने लक्ष पुरवावे, अशी मागणी अमित ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली. आधी विनंती केली आहे, नंतर मात्र बांधलेले हात सोडायला लावू नका, अशी विनंती केल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.