नाशिकच्या स्नुषा हेली आयबेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:16 AM2021-02-16T04:16:17+5:302021-02-16T04:16:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : नाशिकचे डॉ. प्रकाश आणि ललिता जोशी यांची स्नुषा आणि अमेरिकेत स्थायिक पुष्कर जोशी यांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकचे डॉ. प्रकाश आणि ललिता जोशी यांची स्नुषा आणि अमेरिकेत स्थायिक पुष्कर जोशी यांच्या पत्नी हेली आयबेन यांना नुकताच टेक ऑस्कर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. हेली यांनी ब्रेव्ह या चित्रपटातील पात्राच्या केसांची रचना आणि हालचालींवर केलेल्या तांत्रिक कामासाठी त्यांना अकॅडमी ऑफ आर्ट ॲन्ड सायन्सच्या वतीने या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हेली या अमेरिकेतील ॲनिमेशन कंपनीत गत दशकभराहून अधिक काळापासून ग्राफिक विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी केलेल्या एका पात्राच्या केसांची रचना आणि त्याच्या हालचालीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला असून या टीममध्ये त्यांच्यासमवेत अन्य तीन तंत्रज्ञांचा समावेश आहे. अमेरिकेतील लॉज एंजेलीस येथे अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने हा पुरस्कार त्यांना १३ फेब्रुवारीला ऑनलाइन प्रदान करण्यात येणार आहे. हेली यांनी संगणक विज्ञान विषयातील डॉक्टरेट मिळवलेली असून त्या चित्रपटाच्या संपूर्ण निर्मिती तंत्रज्ञानाची बाजू सांभाळतात. ऑस्करइतकाच प्रतिष्ठेचा हा पुरस्कार असल्याने टेक ऑस्कर या तांत्रिक पुरस्कारालादेखील अमेरिकेत तितकेच महत्त्व दिले जाते. डॉ. जोशी यांचे सुपुत्र पुष्कर हे अमेरिकेत अनेक वर्षांपासून सॅन फ्रान्सिस्को येथे गुगल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहेत.