आतापर्यंत १२ आरोपींना फाशीची शिक्षा!
By admin | Published: June 22, 2017 12:43 AM2017-06-22T00:43:07+5:302017-06-22T00:43:20+5:30
नाशिक जिल्हा न्यायालयाने १९७५ पासून गत ४२ वर्षांच्या कालावधीत पाच दुर्मीळ व निर्र्घृण खटल्यातील १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़
विजय मोरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
निर्घृण गुन्ह्यासाठी दिली जाणारी सर्वोच्च शिक्षा म्हणजे मृत्युदंड आणि मृत्युदंडाचा सर्वमान्य प्रकार म्हणून जागतिक पातळीवर फाशीची शिक्षा दिली जाते़ नाशिक जिल्हा न्यायालयाने १९७५ पासून गत ४२ वर्षांच्या कालावधीत पाच दुर्मीळ व निर्र्घृण खटल्यातील १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़ आंतरजातीय विवाह केल्याचा राग वर्षभर मनात धरून गर्भवती लेकीची हत्या करणारा पिता एकनाथ कुंभारकर (४४) यास सोमवारी (दि़ १९) जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी फाशीची शिक्षा सुनावली. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना १८८५ साली झाली़ एम़ बी़ बकेर हे जिल्हा न्यायालयाचे प्रथम प्रधान न्यायाधीश होते़ जिल्हा व सत्र न्यायालयाने १९७५ पासून जिल्ह्यातील पाच निर्घृण गुन्ह्यांतील १२ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे़ या गुन्ह्यामध्ये बेलतगव्हाण येथील सातोटे हत्याकांड, मालेगाव तालुक्यातील पाटील हत्याकांड तसेच अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या पप्पू साळवे खटल्याचा समावेश आहे़ अंधश्रद्धा अर्थात वुवाबाजीतून एका विवाहितेला रात्रभर जबर मारहाण करून तिचा खून केल्याची घटनाही नाशिक शहरातील रविवार पेठेत सोहनी कुटुंबात घडली आहे़ पती व नणंद यांनी केलेल्या या निर्घृण खुनाबाबत या दोघांनाही फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे़ तर नाशिक जिल्ह्यातील पहिला आॅनर किलिंग खटल्याचा नुकताच निकाल लागला असून, यामध्ये पित्यास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे़ न्यायालये फाशीची शिक्षा दुर्मीळ खटल्यातच देतात, याचे प्रमुख कारण म्हणजे गुन्हा केलेल्याला उचित शिक्षा व्हावी तसेच त्या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या अन्य गुन्हेगारांना धडा मिळावा, याचबरोबर सामाजिक स्वास्थ्य लाभावे यासाठी़ अर्थात फाशीच्या शिक्षेबाबत अनेक मत-मतांतरे आहेत़
१४८ देशात फाशीची शिक्षा रद्द़़़
जगभरात मृत्युदंडाची शिक्षा मध्ययुगीन मानली जाते. कोणत्याही गुन्ह्यासाठी माणसाला मृत्यूची शिक्षा देऊ नये, हा एक विचारप्रवाह आहे आणि तो अनेक देशांना मान्यदेखील आहे. सद्यस्थितीत मोजक्याच देशांमध्ये ही शिक्षा दिली जाते तर फाशीच्या शिक्षेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये चीनचा समावेश आहे़ फाशीच्या शिक्षेचा वापर केवळ युद्धकैद्यांसाठी करणारे सात देश आहेत. फाशीच्या शिक्षेचा सर्वाधिक वापर करणाऱ्या देशांमध्ये चीन, इराण, सौदी अरेबिया, अमेरिका, पाकिस्तान यांचा समावेश आहे. तर १४८ देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली आहे. भारतात फाशीच्या शिक्षा अभावानेच दिल्या जातात.
फाशीची शिक्षा झालेले आरोपी
१) सुनील सुरेश ऊर्फ पप्पू साळवे (अल्पवयीन मुली अत्याचार व खून )
२) एकनाथ किसन कुंभारकर (आॅनर किलिंग)
३) अशोक लक्ष्मण सोहोनी, विजया लक्ष्मण सोहोनी (पत्नीचा खून)
४) प्रकाश धवल खैरनार-पाटील व संदीप प्रकाश खैरनार-पाटील (मालेगाव तालुक्यातील सोयगाव हत्याकांड)
५) अंकु श शिंदे, राजा शिंदे, अंबादास शिंदे, राजू शिंदे, बापू शिंदे, सूर्या ऊर्फ सुरेश शिंदे (सातोटे हत्याकांड)