कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:07 AM2021-01-24T04:07:30+5:302021-01-24T04:07:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : काेरोनाचा संसर्ग ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक होत असला तरी बालकांना संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काेरोनाचा संसर्ग ज्येष्ठांसह मध्यमवयीन लोकांना अधिक होत असला तरी बालकांना संसर्ग झाल्याचे अनेक प्रकार देखील घडले आहेत. मात्र, बहुतांश लहान मुलांना संसर्गाची सौम्य लक्षणे असल्याचेच दिसून आले. लहान मुलांना ताप, घसादुखी, खोकला अशी सौम्य लक्षणे आढळली असली, तरी त्यांच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सामान्य होती. त्यामुळे जिल्ह्यात ६,०१९ बालकांना रुग्णालयांना कोरोना झाला तरी त्यातील बहुतांश बालकांना ॲडमिट करावे लागले नसून आतापर्यंत २ बालकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.
ज्यांच्या घरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, त्यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले. त्यात अत्यल्प आणि अल्प उत्पन्न असणाऱ्यांचा मोठा समावेश आहे. त्याशिवाय मुलांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळण्याचा पॅटर्न दिसून आला. अनेक बालकांमध्ये बारीकसा ताप, थोडेसे गरगरणे, खोकला व घसादुखी अशी सौम्य लक्षणे होती.नव्या कोरोना व्हायरस संबंधात जे संशोधन नव्याने पुढे आले त्यात असे आढळले की लहान मुलांना याची लागण होण्याचे प्रमाण कमी असले तरी त्यांना याची लागण होऊ शकते. मात्र, किमान नाशिक जिल्ह्यात तरी १२ वर्षांपर्यंतच्या बालकाचे २ मृत्यू झाले आहेत. ही दोन्ही मुले आहेत. मात्र, त्यापेक्षा मोठ्या अर्थात १२ वर्षांपासून पुढील वयोगटातील मुलांमध्ये बाधिताचे प्रमाण १६,६३२ इतके असून त्या वयोगटातील १९ मुला-मुलींचे मृत्यू झाले आहेत.
इन्फो
मास्कबाबतचे निर्देश
सध्याच्या स्थितीत मास्क वापराबाबत डब्ल्यूएचओने स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार सहाव्या वयापर्यंतच्या बालकांना मास्क लावू नये. त्यावरील बारा वर्षापर्यंतच्या मुलांना कुटुंबियांनी मास्क घालून द्यावे. तर बारा वर्षावरील सर्व बालकांनी नियमितपणे मास्क घालणे आवश्यक असल्याचे त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशात नमूद केले आहे.
इन्फो
मुलांचे बाधितचे प्रमाण अधिक
आतापर्यंतच्या बाधित मुला-मुलींमध्ये मुले बाधित असण्याचे प्रमाण दीडपटीपेक्षा थोडे कमी आहे. ० ते १२ वयोगटात ३,४०९ बालके तर २,६१० बालिका बाधित झाल्या होत्या. तर १२ वर्षापुढील मुला-मुलींच्या प्रमाणात ९,८७४ इतकी मुले तर ६,७५८ मुली बाधित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकूणच बाधितांमध्ये बाहेर खेळण्याचे प्रमाण अधिक असलेल्या मुलांचीच संख्या अधिक आहे.
जिल्ह्यात ० ते १२ वयोगटातील बालकांचे मृत्यू
०२
--------
१२ वर्षापुढील मुला -मुलींचे मृत्यू
१९
----------------
कोट
कोरोनाच्या प्रारंभीच्या टप्प्यातील काळात काही बालकांमध्ये गंभीर लक्षणे होती. त्यात एका अवघ्या २ महिन्याच्या बाळाचे तर ८० टक्के फुप्फुसे बाधित झाली होती. मात्र, कोरोनाच्या सर्व उपचारांसह त्याच्यावर प्लाझ्मा थेरपी केल्यानंतरच ते बाळ बरे झाले. मात्र, गत तीन महिन्यांपासून येणाऱ्या बालकांमध्ये फारशी गंभीर लक्षणे नसल्याने ऑक्सिजन लावण्याचीही गरज भासत नाही.
डॉ. सुशील पारख, बालरोग तज्ज्ञ
-----------
कोट
लहान मुलांमध्ये कोरोनाची अगदी सामान्य लक्षणे होती. जुलाब हे देखील एक लक्षण होते. न उतरणारा ताप हेदेखील एक कोरोनाचे लक्षण आढळून आले. तसेच नकळत कोरोना होऊन गेलेल्या बालकांमध्ये पोस्ट कोविड सिंड्रोमचीही अनेक बालके आढळून आली . पोस्ट कोविड सिंड्रोम हा कोविडपेक्षा अधिक नुकसानदायक असल्याचेही दिसून आले आहे. मात्र, बालकांना ॲडमिट किंवा मृत्यूचे प्रकार घडले नाही.
डॉ. नितीन मेहकरकर, बालरोग तज्ज्ञ
-------------------