अब तक पचास? विमानतळाचा असाही वापर, ३१ जानेवारीची पार्टी तर हिमनगाचे टोक
By admin | Published: February 18, 2015 12:16 AM2015-02-18T00:16:50+5:302015-02-18T00:17:56+5:30
अब तक पचास? विमानतळाचा असाही वापर, ३१ जानेवारीची पार्टी तर हिमनगाचे टोक
नाशिक : विमानतळ बांधून झाल्यावर ते हस्तांतर प्रक्रियेत अडकल्यानंतर या विमानतळाचा वापर साखरपुड्यापासून सेवानिवृत्तीपर्यंतच्या कार्यक्रमासाठी करण्यात आल्याचे अनेक किस्से आता बाहेर येऊ लागले असून, आॅगस्ट महिन्यातील अशाच एका समारंभाचा किस्सा आता समोर आला आहे. ३१ जानेवारी २०१५ची सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. वाय. देशमुख यांंच्या सेवानिवृत्ती निमित्त रात्री दीड वाजेपर्यंत सुरू असलेली साग्रसंगीत पार्टी व त्याअनुषंगाने दिंडोरी तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा यामुळे हे गंभीर प्रकरण जगासमोर आलेले असले तरी प्रत्यक्षात त्यापूर्वीच विमानतळावर अनेक घरगुती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे किस्से आता समोर येऊ लागले आहेत. विमानतळ वापरण्याची परवानगी देणारे कार्यकारी अभियंता राजेंद्र टिल्लू पाटील यांच्यावर नागरी सेवा शिस्त भंगाच्या कार्यवाहीची टांगती तलवार असली आणि राजेंद्र पाटील यांचा नाशिक जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळलेला असला तरी त्यांना जाणीवपूर्वक उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी वेळ मिळावा, या हेतूनेच दिंडोरी तालुका पोलिसांचे ‘हात’ त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नसल्याचे आता बोलले जात आहे. विमानतळाची ३१ जानेवारीची साग्रसंगीत पार्टी ग्रामस्थांमुळेच उघड झाल्याचा दावा करण्यात येत असला आणि तो खराही असला तरी या पार्टीपूर्वी डझनावरी साग्रसंगीत कार्यक्रमाचे या विमानतळावर आयोजन करण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा असून, त्यात चार ते पाच कार्यक्रम तर या एकाच कुटुंबीयांचे तर अर्धा डझनहून अधिक कार्यक्रम हे तर या महसूल विभागाशी निगडीत अधिकाऱ्यांच्या असल्याची चर्चा आहे. असाच एक साग्रसंगीत कार्यक्रम आॅगस्ट महिन्याच्या मध्यान्हावर झाला होती. ३१ जानेवारीच्या साग्रसंगीत पार्टीत गाजलेल्याच एका व्यक्तिशी निगडीत कुटुंबीयातील जवळच्या नातलगाचा साखरपुड्याच्या आधीची ही पार्टी असल्याचे समजते. त्या पार्टीत सहभागी काही लोकांनी या विमानतळावर ३१ जानेवारीची एकमेव पार्टी नव्हे, तर त्यापूर्वीही डझनावर साग्रसंगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे घेणारी मक्तेदार मंडळी यांच्या मधुर संबंधातूनच या डझनावरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)