... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप
By अझहर शेख | Published: February 28, 2023 06:39 PM2023-02-28T18:39:28+5:302023-02-28T18:40:07+5:30
नाशिकच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला लेखी इशारा
नाशिक : नांदगाव तालुक्यातील मौजे सजा-साकोरे, पांझण, डॉक्टरवाडी भागातील वनजमिनी शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती. या जमिनीवर एका खासगी कंपनीकडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने राखीव वनजमिनीचा सौदा झाल्याचे उपवनसंरक्षकांच्या पत्रातून समोर आला. येथील शेतकऱ्यांना बळजबरीने जमिनी कसण्यापासून रोखत त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप करत पिडित शेतकरी महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी धडक दिली. अपर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत दोन दिवसांत प्रशासनाने दखल घेतली नाही, ‘तर आम्ही कसत असलेल्या जमिनीवर स्वत:चे सरण रचून जीवन संपवू असा इशारा यावेळी भूमीहीन शेतरकऱ्यांनी दिला.
साकोरे येथील जुन्या गट क्रमांक ८०१पैकी मौजे पांझणच्या सरकारी पडीत जमिनीवर केलेले वतीधारकांचे कब्जे कायमस्वरूपी करून त्यांना शेतीचा उतारा दिला जावा. तसच सौर उर्जा कंपनीच्या अतिक्रमणाची चौकशी करून वन विभागाचा ना हरकत दाखला नसतानाही कंपनीकडून केले जाणारे बांधकाम तत्काळ बंद करावे, या मागण्यांसाठी राज्य किसान सभा, जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत फलक झळकावले. तसेच येथील मध्यवर्ती सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत ठिय्या देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न यावेळी पिडित शेतकऱ्यांनी केला.
याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, नांदगाव तहसिलदार सर्वांना लेखी स्वरुपात यापुर्वीही निवेदने दिली आहेत; मात्र कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता पुन्हा जर गुंडांनी धमकावले आणि जमिन कसण्यापासून रोखले तर त्याच जमिनीवर भूमिहीन शेतकरी स्वत:ला संपवून घेतील, असे लेखी पत्रात म्हटले आहे. तब्बल वीस भूमिहिन शेतकऱ्यांनी असे आत्महत्या करण्याचे पत्र यावेळी प्रशासनाकडे सुपुर्द केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, प्रकाश भावसार यांच्यासह स्थानिक कब्जेदार शेतकरी माणिक हिरे, तुकाराम सोनवणे, ताराबाई बोरसे, सुमन साळुंके, शिवाजी जाधव, राजेंद्र सुर्वे, रमेश कदम, प्रकाश भावसार रत्नाबाई अहिरे, सुपादाबाई अहिरे, साहेबराव झेला आदी उपस्थित होते.
गुंडांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या!
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राज्य किसान सभेच्या नेतृत्वात वीस पिडित भुमीहिन पुरूष, महिला शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना स्वतंत्ररित्या लेखी पत्र देत आत्महत्येचा इशारा दिला आहे. या पत्रात त्यांनी नांदगाव तालुक्यात कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी बाऊन्सर घेऊन येणाऱ्या गुंडांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.