..तर सिन्नर, निफाडसह येवल्यात पुन्हा निर्बंध !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2021 01:35 AM2021-10-09T01:35:28+5:302021-10-09T01:36:31+5:30
जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यात अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत असून हाच कल कायम राहिल्यास या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा निर्बंध लावावे लागतील. तसेच तालुका बाजार समित्यांसह अन्य कोरोनाचे हॉटस्पॉट शोधून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतही प्रशासनाला आदेशित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक : जिल्ह्यात प्रामुख्याने सिन्नर, निफाड आणि येवला तालुक्यात अधिक प्रमाणात रुग्णसंख्या वाढ होत असून हाच कल कायम राहिल्यास या तीन तालुक्यांमध्ये पुन्हा निर्बंध लावावे लागतील. तसेच तालुका बाजार समित्यांसह अन्य कोरोनाचे हॉटस्पॉट शोधून त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतही प्रशासनाला आदेशित करण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत नसली तरी एक हजारांच्या आसपास स्थिर आहे. लसीकरणाला सर्वाधिक वेग देण्यासह जिल्ह्यातील कोरोना संक्रमणात संवेदनशील असलेल्या ठिकाणांचा व परिसराचा अंदाज घेऊन त्या ठिकाणांवर तत्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम गतिमान करण्यात येईल. तसेच जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या तालुक्यांतील ग्रामीण भागात नागरिकांनी कठोर निर्बंधांची वेळ न येऊ देता सतर्कता बाळगून संभाव्य लाट थोपवावी, भुजबळ यांनी केले आहे. तीन तालुके वगळता अन्यत्र कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. विशेषतः निफाड आणि येवला तालुक्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने अधिक सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळल्यास यापुढे होम क्वारंटाइन राहण्यास परवानगी दिली जाणार नाही, तर अशा रुग्णांना थेट रुग्णालयांमध्येच दाखल करावे लागेल. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नसताना, नियम पूर्णपणे पाळले जात नाहीत. ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढे बाजारपेठा बंद कराव्या लागतील, असे संकेतदेखील पालकमंत्री भुजबळ यांनी दिले. या वेळी बोलताना भुजबळ म्हणाले, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी यासारख्या सणांच्या निमित्ताने व बाजारांच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहता सर्व नियमांसह सुरक्षित अंतराच्या नियमांचा अंगीकार केला नाही तर पुन्हा परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे वेळ आल्यास निर्बंधही कठोर करावे लागतील. सर्व आस्थापनांकडून कोरोना प्रतिबंधासाठी सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करत असल्याबाबतचे प्रमाणपत्र घेण्यात येणार असल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. कोविड चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत संबंधित व्यक्ती विलगीकरणात राहील याबाबत स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग यांनी दक्षता घ्यावी. कृषी उत्पन्न बाजार समित्या, कांदा टोमॅटो यांचे बाजार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने तेथे गर्दी प्रतिबंधक उपाययोजना केल्या आहेत का, याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी बाजाराच्या दिवशी भेटी देऊन संबंधितांवर कारवाई करावी, असेही आदेशित करण्यात आले असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.
इन्फो
हॉटस्पॉटवर बारकाईने लक्ष
कोविड संसर्गाच्या दृष्टीने संवेदनशील बाजार समित्यांसह अन्य गर्दीच्या क्षेत्रात कोठून नागरिक जात आहेत, त्यातून योग्य प्रकारे हॉटस्पॉट ठरवून त्या हॉटस्पॉटकडे विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे ठरणार आहे. हे तत्त्व लक्षात ठेवून कोविडचा अधिक प्रभाव असलेल्या जिल्ह्यांना लागून असलेल्या तालुक्यांमधील नागरिकांची स्थाने प्रशासनाकडून निश्चित करण्यात येत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये एखादी आस्थापना वारंवार येत असल्याचे निदर्शनास आले तर संबंधित आस्थापना बंद करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक तालुक्यातील हॉटस्पॉट निश्चित करून तेथे फिरणाऱ्या व लक्षणे असणाऱ्या सर्व व्यक्तींची कोविड टेस्ट करून घेण्याची व्यवस्था त्या हॉटस्पॉटच्या आस्थापना चालकांच्या मदतीने स्थापित केली जाणार असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.