..तर रोज नऊशे इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 11:19 PM2020-08-19T23:19:14+5:302020-08-20T00:24:05+5:30
नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे तीन संस्था आणि दीड लाख घरे किंवा इमारती याचे गुणोत्तर काढले तर एकेका दिवसात तब्बल नऊशे मिळकतींचे आॅडीट करावे लागणार आहे.
नाशिक : शहरातील जुन्या म्हणजेच तीस वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेल्या १ लाख ५७ हजार घर अथवा इमारतींचे स्ट्रकचरल आॅडीट करण्याच्या सूचना नाशिक महापालिकेने दिल्या आहेत. तथापि, त्यासाठी संपूर्ण शहरातून अवघ्या तीनच संस्था प्राधीकृत करण्यात आले आहे. त्यामुळे तीन संस्था आणि दीड लाख घरे किंवा इमारती याचे गुणोत्तर काढले तर एकेका दिवसात तब्बल नऊशे मिळकतींचे आॅडीट करावे लागणार आहे. त्यानंतरही सर्व इमारतींचे आॅडीट होणे जवळपास अशक्यच असल्याचे दिसते आहे. गोदाकाठी वसलेले गाव असल्याने गावठाण भागात पन्नास- शंभर दीडशे वर्षांचे आयुर्मान असलेले वाडे आहेत. महापालिका स्थापन होताना आणखी २३ गावठाण एकत्र आल्याने तेथे देखील जुने वाडे आहेत. दरम्यान, असे वाडे वगळता देखील ज्या इमारती किंवा घरे तीस वर्षांपेक्षा अधिक जुने घरे आहेत,त्याची संख्या ही अधिक आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुदसार शहरात एकुण ४ लाख ७९ हजार ६०० मिळकती आहेत. त्यातील १लाख ५७ हजार ३५७ इमारती तीस वर्षांपेक्षा
अधिक काळापेक्षा जुन्या आहेत. नियमानुसार अशा इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडीट होणे गरजेचे आहे. विशेषत: लोड बेअरींगच्या जुन्या घरांचे अशाप्रकारचे आॅडीट होणे आवश्यक आहे. महापालिकेने काही वर्षांपूर्वी स्ट्रक्चरलआॅडीटसाठी संस्था नियुक्तीसाठी अर्ज मागवले होते. त्यानुसार मविप्र,संदीप फाऊंडेशन आणि एका खासगी कंपनीला स्ट्रक्चरल आॅडीटचे दर निश्चित करून देण्यात आले आहेत. या संस्थांनी स्ट्रक्चरल आॅडीट केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र महापालिकेला सादर करायचे आहे. तसेच या प्राधीकृत संस्थांच्या सूचनेनुसार वास्तुत दुरूस्ती अथवा अन्य बदल करणे आवश्यक आहे. तथापि, १ लाख ५७ हजार घरे आणि स्ट्रक्चरल आॅडीटसाठी अवघ्या तीन संस्था यांचा विचार केला तर वर्षभर अगदी रोज हे काम करायचे तरी ९०० इमारतींना रोज भेट द्यावी लागेल आणि एकाच दिवशी ९०० घरांना भेट देणे या तीन्ही प्राधीकृत संस्थांना तरी शक्य होईल काय असा प्रश्न केला जात आहे. मुळातच महापालिकेने संख्या वाढविण्याची गरज आहे. काय असते स्ट्रक्चरल आॅडीट ?इमारत कितपत टिकू शकेल आणि भार सहन करू शकेल यासाठी स्ट्रक्चरल आॅडीट केले जाते. बांधकाम करताना देखील स्ट्रक्चरल इंजिनिअरचे प्रमाणपत्र आवश्यक ठरते. जुन्या मिळकतींची मजबुती तपासण्यासाठी व्हिज्युएल इन्स्पेक्शन, हॅमर टेस्ट आणि कोअर टेस्ट केली जाते. त्या आधारे आयुर्मान काढले जाते.शहरातील दीड लाखाहून अधिक इमारतींचे केवळ तीन संस्थांमार्फत स्ट्रक्चरल आॅडीट करणे व्यवहारीक दृष्टया शक्य नाही. मेरी सारख्या सरकारी संस्था तसेच अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आणि खासगी लॅब्ज उपलब्ध आहे. त्यांना संधी दिल्यास स्ट्रक्चरल आॅडीटचे काम पुढे जाऊ शकेल.
- अरूण काबरे, वास्तुविशारद, नाशिक