...म्हणून फिरविली विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे पाठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:19 AM2021-08-25T04:19:43+5:302021-08-25T04:19:43+5:30
नाशिक : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत ...
नाशिक : जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १५ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आतापर्यंत जिल्ह्यातील खासगी व शासकीय आयटीआयमधील ६ हजार ६२४ जागांसाठी सुमारे ११ हजार ६१२ अर्ज प्राप्त झाले होते. ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत साडेसहा हजाराने कमी असून उपलब्ध जागांपैकी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी प्रवेश मिळविण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे, त्यामुळे जवळपास सहा ते साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरविल्याचे बोलले जात आहे. आयटीआयला प्रवेश घेतला म्हणजे नोकरीची संधी पक्की अशी एकेकाळी समजूत होती. ती आजही काही प्रमाणात कायम आहे असली तरी अनेक विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशीपनंतरही कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामकाजाची संधी मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशाकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा शैक्षणिक क्षेत्रात आहे.
----
गतवर्षीपेक्षा कमी प्रतिसाद
१) आयटीआय प्रवेशासाठी सर्वच विद्यार्थ्यांकडून फिटर ट्रेडला सर्वाधिक पसंती दिली जाते. परंतु, या ट्रेडला मर्यादित जागा असल्याने प्रवेश मिळत नाही.
२) टर्नर ट्रेडची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही अपेक्षाभंग होत असल्याने विद्यार्थ्यांकडून आयटीआय प्रवेशार्थी इच्छुकांच्या संख्येत घट झाली आहे.
३) बदलत्या काळानुसार, आयटीआयकडे वळणार विद्यार्थी इंजिनियरिंग, डिप्लोमासारख्या अभ्यासक्रमांना प्राधान्य देऊ लागल्याने आयटीआयकडे विद्यार्थ्यंाचा कल घटला आहे.
४) गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे सर्वच विद्या शाखांमधील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली होती. असाच परिणाम यावर्षीही दिसून येत असून गेल्यावर्षी क्लिष्ट प्रवेश प्रक्रियेमुळे १५ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या.
-----
विद्यार्थी म्हणतात ....
आटीआय केलेल्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटीसशीपच्या माध्यमातून तत्काळ नोकरीची संधी उपलब्ध होत असल्याने आटीआयला प्रवेशासाठी अर्ज करण्यास कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. परंतु, आयटीआय केलेल्या काही विद्यार्थ्यांनी ॲप्रेंटीसशीप करूनही नोकरीची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अद्यापही अर्ज केले नाही.
ओमकार जाधव, विद्यार्थी
---
शासकीय आयटीआयच्या माध्यमातून किमान खर्चात कौशल्य शिक्षण मिळते, त्यामुळे कुटुंबीयांकडून आयटीआयला प्रवेश घेण्यास सांगितले जात आहे. मात्र बदलत्या काळानुसार कौशल्य शिक्षणाचे अनेक पर्याय उपलब्ध झाले असून आयटीआयपेक्षा इंजिनियरिंग, डिप्लोमासारखा पर्याय निवडला तर भविष्यात चांगली संधी मिळू शकेल, त्यामुळे आयटीआयसाठी अर्ज केला नाही.
- हर्षल यादव, विद्यार्थी
---
१) जिल्ह्यातील शासकीय आयटीआय - १५
एकूण प्रवेश क्षमता - ४,९३२
खासगी आयटीआय -१६
एकूण प्रवेश क्षमता -१,६९२
एकूण जागा -६,६२४
आतापर्यंत आलेले अर्ज -१२,७५०
--
म्हणून घटले आयटीआयचे प्रवेश
विविध अभियांत्रिकी विद्या शाखेच्या वाढलेल्या जागा आणि वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे पर्याय उपलब्ध झाल्याने आयटीआय प्रवेशाच्या रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे.
विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षणाचे पर्याय उपलब्ध झाल्याने आयटीआय प्रवेशाला मागील वर्षापेक्षा कमी प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आयटीआय प्रवेशाकडे वळविण्यासाठी नाशिक जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे विशेष विद्यार्थी प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व प्रशिक्षण या संदर्भात माहिती देऊन त्यांना आयटीआयकडे वळविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती नाशिकच्या सातपूर येथील औद्योगिक वसाहतीतील सूत्रांनी दिली आहे.