...तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? विनायक मेटे यांचे राज्य शासनावर ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 06:37 PM2020-07-01T18:37:22+5:302020-07-01T18:39:29+5:30
नाशिक : कोरोनाच्या बाबतही जर विठूमाउलीच सगळं काही करणार असेल तर मुख्यमंत्र्यांची गरजच काय? मुख्यमंत्र्यांनी पण हात टेकले असतील आणि विठ्ठलानेच सारं काही हाती घ्यायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी पायऊतार व्हावे, अशा शब्दात आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. या शासनाला मराठा आरक्षणाबाबत कोणतेही गांभीर्य नसल्यानेच गत सहा महिन्यांत मराठा आरक्षण, शिवस्मारक आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाची एकही बैठकदेखील झाली नसल्यावरून शासन मराठाविरोधी असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

नाशिक दौऱ्यावर आले असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी, शिवस्मारकासाठी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाबाबत गत सहा महिन्यांत अद्यापही बैठकच झालेली नाही. मराठा आरक्षणावेळी घालण्यात आलेल्या अनेक केसेस कार्यकर्त्यांवर अद्यापही कायम आहेत. आरक्षणादरम्यान ज्या आंदोलकांनी बलिदान दिले, त्यांच्या वारसांना दहा लाख आणि शसकीय नोकरीचे आश्वासन तत्कालीन शासनाने दिले होते. त्याबाबतदेखील शासनाने पुढे काहीच केलेले नाही. गत सहा महिन्यांत मराठा समाजाशी निगडीत एकही प्रश्न या शासनाने हाताळला नसून हे शासन मराठाविरोधी असल्याचा समज जनतेत पसरत चालला आहे. हे अत्यंत निराशावादी सरकार असून, या शासनाने मराठा समाजाचाही कोणताही प्रश्न हाती न घेता केवळ समाजाला गृहित धरले असल्याचा आरोपदेखील मेटे यांनी केला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्टिंग आॅपरेशन केले, पण त्याचा फायदा काय? कुणावर कारवाई केली? बोगस कंपन्यांवर कारवाई नाही, शासनाच्या महाबीज कंपनीचे बियाणे बोगस निघाले, त्यांच्यावर काय कारवाई केली? सारीच परिस्थिती आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशीच आहे. नुकसानभरपाईदेखील शासनाने जाहीर केली नसून, मग दादा भुसे यांनी स्टिंग काय केवळ प्रसिद्धीच्या हव्यासासाठी केले काय? असा सवालदेखील मेटे यांनी उपस्थित केला.