सिन्नर येथील कामांचे होणार सामाजिक अंकेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 11:39 PM2017-12-25T23:39:29+5:302017-12-26T00:20:19+5:30
तालुक्यात गेल्या वर्षी महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०१८ रोजी पंचायत समिती कार्यालयात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सिन्नर : तालुक्यात गेल्या वर्षी महात्मा गांधी राष्टÑीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर २४ जानेवारी २०१८ रोजी पंचायत समिती कार्यालयात जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.रोजगार हमी योजनेतून झालेल्या कामांचा ग्रामसभेत ऊहापोह करण्यासाठी, कामात पारदर्शकता यावी व झालेल्या कामांची ग्रामस्थांना माहिती व्हावी, यासाठी गावोगावी ग्रामसभा आयोजित करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी, ज्या गावांमध्ये मनरेगाच्या कामांचे सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे त्या गावांतील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी व कृषी सहायक यांची पंचायत समितीच्या सभागृहात कार्यशाळा घेऊन त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. तहसीलदार नितीन गवळी, गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, तालुका कृषी अधिकारी अरुण दातीर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते. पंचायत समिती कार्यालयात घेण्यात आलेल्या या कार्यशाळेत तहसीलदार गवळी व गटविकास अधिकारी पगार यांनी सामाजिक अंकेक्षणाची माहिती दिली. तालुक्यातील २० गावांमधून यासाठी प्रत्येकी ३ साधन व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. २० गावांमधून ६० साधन व्यक्ती, ५ समूह साधन व्यक्ती, तर १ तालुका साधन व्यक्ती असणार आहे. १० ते १३ जानेवारी रोजी साधन व्यक्तींचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यानंतर १५ ते २० जानेवारी रोजी सामाजिक अंकेक्षण करण्यात येणार आहे. २२ जानेवारी रोजी संबंधित २० गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात गेल्या वर्षी गावात झालेल्या मनरेगाच्या कामांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर २४ जानेवारी रोजी सिन्नर पंचायत समितीत तालुक्यातील जनसुनावणी होणार आहे. त्यात आलेल्या कामांच्या तक्रारीवर सुनावणी केली जाणार आहे.