स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशभक्तीचे भरते, पण...,
By azhar.sheikh | Published: August 14, 2018 02:23 PM2018-08-14T14:23:32+5:302018-08-14T14:29:57+5:30
राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे.
अझहर शेख नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर देशप्रेम, देशभक्तीचे भरते आले आहे. ‘डीपी’, ‘प्रोफाईल’, ‘स्टेटस’देखील नेटिझन्सकडून बदलले जात आहेत.राष्ट्रभक्तीचा हा उत्साह वाखाण्याजोगा नक्कीच आहे; मात्र यासोबत आपल्या राष्ट्राचे आपण आदर्श नागरिक असून राष्ट्रउभारणीसाठी आपले योगदान गरजेचे आहे, याचा विसर आपल्याला दैनंदिन दिनचर्येत पडतो, हे दुर्दैवच. आपल्याला संविधानाने जसे अधिकार बहाल केले आहे, तसे कर्तव्यही सांगितले आहे. एक भारतीय म्हणून आपण आपल्या देशाचे कायदे, नियमांचे किती पालन करतो? याचा विचार करणेदेखील गरजेचे आहे. आपण साधा सिग्नलदेखील अनेकदा पाळत नाही, तर मग आपल्या देशाभिमानाला काय अर्थ राहतो? हे तरुणाईने अंतर्मुख होऊन विचार करणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन वगळता अन्य दिवसांमध्ये आपल्याला राष्ट्रप्रेम, देशाविषयीची आपुलकी, करुणा का आठवत नाही? देशाचे सुजाण नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी कर्तव्याच्या माध्यमातून कधी पार पाडणार आहोत? हा प्रश्न नेहमीच अनुत्तरीत राहिलेला आहे.
देशाचे नागरिक म्हणून आपल्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत सतत तेवत ठेवायला हवी. केवळ स्वातंत्र्यदिन अन् प्रजासत्ताक दिनापुरतेच राष्ट्रप्रेम मनात जागृत न करता हे राष्ट्रप्रेम वर्षाचे बारामहिने जागृत ठेवण्याचीराष्ट्रउभारणीसाठी गरजेचे आहे.
स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्र सण आहेत. या तारखांना आपण सार्वजनिक सुटीचा आनंद लुटण्यासाठी घराबाहेर पडतो अन् देशप्रेमाचा बेभान होऊन विसरतो. निसर्गरम्य ठिकाणी पर्यटनासाठी १५ आॅगस्टला बाहेर पडल्यानंतर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, रॅपरचा कचराही सर्रासपणे पर्यटनस्थळांवर फेकून घरी परततो. कचऱ्याची विल्हेवाटदेखील योग्यरित्या लावू शकत नाही? राष्ट्रप्रेम, देशभक्ती केवळ ‘डीपी’, ‘प्रोफाइल’, ‘स्टेटस’पुरतीच आपण मर्यादित ठेवणार आहोत का? याचा विचार तरुणाईने करणे गरजेचे आहे. आपण आपल्यापासून जर बदल घडविला तर आपोआप समाज बदलेल मात्र नेमके समाज बदलत नाही, तर आपण का बदलायचे असा विचार मनात आणला जातो आणि तेथेच गल्लत होते व राष्ट्रउभारणीचे काम मागे पडते.
एक आदर्श भारतीय नागरिक बनण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करु आणि आपल्या जीवनशैलीत अमुलाग्र बदल घडवून आणू तेव्हा खरा स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिन सार्थकी लागेल!