विवाहाच्या आमंत्रणासाठी हवे सोशल मीडिया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 12:55 AM2018-05-08T00:55:41+5:302018-05-08T00:55:41+5:30
सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़
नाशिक : सध्या लग्नसराईचे दिवस आहेत़ वर-वधूचे कुटुंबीय विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी जात असताना अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत़ या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘विवाहपत्रिकांऐवजी सोशल मीडियाचा वापर करा’ ही चळवळ सुरू आहे़ सोशल मीडियावरील या चळवळीबाबत ‘लोकमत’ने केलेल्या या वृत्ताचे वाचकांनी समर्थन केले आहे़ विवाहपत्रिका घरोघरी जाऊन निमंत्रण देण्यासारख्या पारंपरिक मार्गाऐवजी आधुनिकतेची कास धरण्याची गरज असल्याचे मतही काहींनी व्यक्त केले आहे़ तुलसीविवाहानंतर विवाह सोहळे सुरू होत असले तरी विवाहांची सर्वाधिक संख्या ही उन्हाळ्याच्या सुटीतच असते़ मुलांच्या परीक्षा, सुट्या या सर्वांचा विचार करून उन्हाळ्यात विवाह समारंभाचे आयोजन केले जाते़ उन्हाचा कडाका, दूर अंतरावरील नातेवाईक, प्रत्येकाच्या घरी जाऊन आमंत्रण यामुळे पत्रिका वाटप करणारे वर-वधूचे कुटुंबीय हैराण होतात़
पूर्वी सोशल मीडिया वा मोबाइलसारखी साधने नव्हती, त्यामुळे पत्रिका छापणे आमंत्रण देणे हे अपरिहार्य होते़ मात्र आता काळ बदलला आहे. मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया वेगवान झाले आहेत. एका मिनिटात हजारो, लाखो लोकांपर्यंत पोहोचता येते़ मुलाच्या विवाहासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता व आमंत्रणाच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा नवीन पद्धत सुरू करावी यासाठी केवळ देवी-देवता, मंदिर व विवाहाचे प्रमाणपत्र यासाठी केवळ अकरा पत्रिका छापल्या़ उर्वरित अग्रवाल समाजातील सर्व नातेवाइकांचा ग्रुप तयार करून विवाहाच्या आमंत्रणाचे संदेश पाठविले़ सुशिक्षित लोकांना हा प्रयोग खूप आवडला मात्र बुजुर्ग लोकांना ही पद्धत फारशी रुचली नाही़ मोठा मुलगा लंडनला आहे, त्याला हा प्रकार सर्वात आवडला़ या पद्धतीमध्ये केवळ एकदा संदेश पाठवून होत नाही तर वारंवार स्मरण करून द्यावे लागते इतकेच़ - ओ़ पी़ रुंग्ठा, नागरिक, नाशिक
कर्जबाजारीपेक्षा खर्च कमी करावा
लग्नसराईच्या काळात लग्नपत्रिका वाटपाचे महत्त्वाचे काम असते आणि ग्रामीण भागात याबाबत अधिक काम असते. मानपान सांभाळणे आणि प्रत्येकापर्यंत पत्रिका पोहोचवण्याची जबाबदारी लग्नघरातील कुटुंबाला पार पाडावी लागते. पत्रिकांचे वाटप कमी केल्यास खर्च कमी होतो, परंतु मुळात पत्रिकेपेक्षा वाटपावरच मोठा खर्च होतो. त्यातच ग्रामीण भागातील शेतकरी घरातील लग्नासाठी कर्जबाजारी होतात, परंतु लग्न जोमाने साजरे करतात. कर्जबाजारी होण्यापेक्षा मर्यादित खर्च बरा आणि पत्रिका वाटपाची काळानुसार कितपत गरज आहे, याचा विचार करून शक्य त्या ठिकाणी फोन किंवा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे. - कैलास दळवी, माजी सरपंच, विंचूर दळवी
पुतण्याच्या विवाहात मानापमान नाट्य, रुसवे-फुगवे टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने पत्रिका छापून वाटल्या़ मात्र पत्रिकांची संख्या मर्यादित ठेवून उर्वरित बहुतांशी सर्व आमंत्रणे ही मोबाइल व सोशल मीडियावरून दिली़ विवाह समारंभात पत्रिका मिळाली नाही याऐवजी तुमचा सोशल मीडियावर संदेश आला व ही पद्धती चांगली असल्याच्या प्रतिक्रियाच बहतांशी नातेवाइकांनी दिल्या़ त्यामुळे आमंत्रणासाठी सोशल मीडियाचा वापर केल्यास वेळ, पैसा यांची बचतच होईल़ - धनंजय माळोदे, आडगाव